

भाईंदर (ठाणे) : मिरा-भाईंदर महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवात 6 फुटांपर्यंतच्या गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करीत 6 फुटांवरील मुर्त्यांच्या विसर्जनासाठी नैसर्गिक तलाव व चौपाटीवर व्यवस्था केली आहे. पालिकेच्या या निर्णयाला भाईंदर येथील राई, मोर्वेकर ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत नैसर्गिक तलावातच विसर्जन केले.
पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत यंदाच्या गणेशोत्सवात 6 फुटांवरील गणेश मुर्त्यांच्या विसर्जनासाठी तब्बल 35 कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. हे कृत्रिम तलाव मुख्य गणेश विसर्जनस्थळी साकारण्यात येऊन 6 फुटांवरील गणेश मुर्त्यांच्या विसर्जनासाठी नैसर्गिक तलाव व भाईंदर पूर्व व पश्चिम चौपाटीवर परवानगी देण्यात आली. तशी अधिसूचना आयुक्तांकडून जारी करण्यात आली असली तरी त्याबाबत पुरेशी वा व्यापक जनजागृती पालिकेकडून करण्यात आली नाही. त्यामुळे दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनावेळी गणेश भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा सर्वाधिक विरोध भाईंदर पश्चिमेकडील राई व मोर्वा गावात दिसून आला.
येथील गणेश विसर्जनाची सामूहिक मिरवणूक सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास निघाली. मिरवणूक तेथील तलावाजवळ गणेश विसर्जनासाठी आली असता तलावाला टाळे लावण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यावेळी तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ग्रामस्थांना मुर्त्यांचे विसर्जन नैसर्गिक तलावाऐवजी तेथील कृत्रिम तलावात करण्याचे निर्देश दिले. त्यावर संतप्त ग्रामस्थांनी कृत्रिम तलावातील विसर्जनाला तीव्र विरोध दर्शवित भर पावसात तलावाजवळच नैसर्गिक तलावातील विसर्जनावर अडून बसले. त्यांना पोलिसांनी तसा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी आमच्या मुर्त्या शाडू मातीच्या असल्याने त्यांचे विसर्जन नैसर्गिक तलावात केल्यास पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे नैसर्गिक तलावातच विसर्जन करण्यासाठी तलावाला लावलेले टाळे उघडण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. मात्र पोलिसांनी टाळे न उघडल्याने संतप्त ग्रामस्थांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला तरी चालेल पण पर्यावरणपूरक मुर्त्यांचे विसर्जन नैसर्गिक तलावातच करण्याचा पावित्रा घेतला. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण होत असतानाच पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट देत ग्रामस्थांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन केले. दरम्यान ग्रामस्थांनी पालिका अधिकार्यांना पाचारण करण्याची मागणी केली. त्यावर सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी आपल्याला नैसर्गिक तलावात विसर्जन करण्याबाबतचा अधिकार नसल्याचे सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी वरीष्ठ अधिकार्यांना पाचारण करण्याची मागणी केली.
एक तासानंतरही पालिकेच्या एकही वरीष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी हजेरी न लावल्याने ग्रामस्थांनी एक तासाच्या प्रतिक्षेनंतर रात्री 8.30 वाजताच्या सुमारास नैसर्गिक तलावाचे टाळे तोडून तलावातच गणेश मुर्त्यांच्या विसर्जनाला सुरुवात केली.
दीड दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी पावसाने हजेरी लावल्याने विसर्जनात काहीसा व्यत्यय आला. त्याला न जुमानणार्या भक्तांच्या उत्साहापुढे वरुणराजाने काहीही चालले नाही. भक्तांनी भरपावसातच गणेश विसर्जन केले. मात्र विसर्जनस्थळी मुर्त्यांच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा फतवा पालिकेकडून काढण्यात आल्याने भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत पालिकेकडून पुरेशी जनजागृतीच करण्यात आली नसल्याने भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.