

भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिकेने आस्थापनेवरील रिकामी पदे भरून काढण्यासाठी बहुप्रतिक्षेनंतर 358 पदांची मेगा भरती सुरु केली आहे. या भरतीद्वारे फायरमनची तब्बल 241 पदे भरली जाणार आहेत. तत्पूर्वी अग्निशमन विभागात गेल्या 7 वर्षांपासून फायरमन व मजूर पदावर एकूण 150 कमर्चारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. भरतीतील वयाच्या अटीशर्तींमुळे त्यातील सुमारे 70 कर्मचारी भरतीतून बाद होण्याची शक्यता असल्याने या कर्मचार्यांनी वयाची अट शिथिल होण्यासाठी धावाधाव सुरु केल्याचे समोर आले आहे.
पालिकेने अग्निशमन विभागात 7 वर्षांपूर्वी मजूर पदावर सुमारे 150 कर्मचार्यांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केली होती. यातील सुमारे 100 मजुरांनी खाजगी संस्थेद्वारे फायरमनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याने त्यांना फायरमन पदावर कंत्राटी पद्धतीनेच नियुक्त करण्यात आले. त्यासाठी वेगळी निविदा काढण्यात आली. नवीन निविदेनुसार एकूण 150 पैकी 100 कर्मचार्यांना फायरमन पदावर नियुक्त करीत मजूर पदावर 50 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. या पूर्वी पालिकेच्या आस्थापनेवर मजूर पदावर नियुक्त करण्यात आलेल्या काही स्थायी कर्मचार्यांना पुढे अग्निशमन विभागात घेण्यात आले. त्यावेळी त्यांना फायरमन, चालक पदाची कामे देण्यात आली.
यानंतर वाढत्या शहरीकरणामुळे पालिकेने अग्निशमन विभागाचा विस्तार केला. यामुळे विभागात कर्मचार्यांची आवश्यकता निर्माण झाल्याने पालिकेकडून 7 वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीवर 50 मजूर व 100 फायरमनची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान पालिकेच्या मंजूर बिंदू नामावलीनुसार अग्निशमन विभागात कर्मचार्यांचा बॅकलॉग निर्माण झाला. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पालिकेने बहुप्रतिक्षेनंतर मेगा भरती सुरु केली आहे. हि भरती सरळसेवा पद्धतीने करण्यात येणार असून त्याच्या पूर्व परीक्षेसाठी टाटा कन्सल्टन्सी कंपनी (टिसीएस) ला नियुक्त करण्यात आले आहे.
या भरतीत पालिकेतील विविध विभागात रिक्त असलेली एकूण 358 पदे भरली जाणार असून त्यात अग्निशमन विभागासाठी तब्बल 241 फायरमनची (अग्निशमक) पदे भरली जाणार आहेत. या भरतीद्वारे गेल्या 7 वर्षांपासून अग्निशमन विभागात मजूर व फायरमन पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना थेट सामावून घेण्यासाठी वयाची अट शिथिल करण्याची मागणी या कर्मचार्यांनी केली आहे. एकूण 150 कर्मचार्यांपैकी सुमारे 70 कर्मचार्यांचे वय भरतीतील अटीशर्तीनुसार बसत नसल्याने त्यांना या भरतीला मुकावे लागत असल्याचे समोर आले आहे. वयाची अट शिथिल होण्यासाठी या कर्मचार्यांनी शहरातील काही राजकीय नेत्यांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.
तत्पूर्वी त्यांनी या भरतीविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तूर्तास न्यायालयाची वाट न धरता त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने त्यावर येत्या सोमवारी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.
या भरतीत कर्मचार्यांची निवड झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना पालिकेकडून नारळ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता असून या कर्मचार्यांना प्रशासनाने सेवेत सामावून घेतल्यास त्यातील 100 कर्मचार्यांच्या स्वतंत्र प्रशिक्षणाची आवश्यकता भासणार नाही. यात पालिकेच्या निधीची मोठी बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे.