

नालासोपारा : नालासोपाराहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा लटकून प्रवास करण्याची धोक्याची प्रचिती देणारी गंभीर घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी 9:10 च्या अप लोकलमध्ये नालासोपारा-वसई दरम्यान दोन प्रवासी पडल्याची दुर्घटना घडली. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला, दुसरा प्रवासी गंभीर जखमी आहे.
घटनेत प्रतीश बाळाराम भोले (35, रा. म्हसळा, जि. रायगड) हे गाडीतून पडून जागीच ठार झाले. तर नानासाहेब बंधने (32) हे गंभीर जखमी असून त्यांना तत्काळ उपचारासाठी नालासोपाऱ्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दररोज प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमध्ये लटकून प्रवास करण्याचे प्रमाण वाढले आहे.
वाढत्या प्रवासीभाराचा विचार करता ट्रेनची संख्या वाढवण्याची आणि सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रवासी संघटनांकडून सांगितले जात आहे. रेल्वे प्रशासनानेही या प्रकरणी तपास सुरू केला असून गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त गाड्यांची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.