

मिरा रोड : सध्या डेटिंग ॲपवर मुली मुलांशी ओळख करतात. त्यानंतर त्यांना विविध ठिकाणी लॉजिंगमध्ये भेट घेण्याच्या बहाण्याने बोलावून त्यांच्यासोबत दारू पिऊन ते फुल नशेत झाल्यानंतर त्यांचे सोन्याचे दागिने, मोबाईल इतर वस्तू घेऊन जाण्याचा प्रकार घडत आहे. असाच एक प्रकार काशिमिरा येथे घडला आहे. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मांडवी पोलीस ठाणे हद्दीतही अशाच प्रकारची घटना घडली आहे.
मिरा-भाईंदर, वसई विरार परिसरात हॅपन डेटिंग ॲपवर विविध मुलांशी मैत्री करायची आणि त्यातून पार्टी करण्याचे ठरवून भेटायचे त्यानंतर तरुण किंवा पुरुष यांना दारूच्या नशेतून झोपल्यानंतर त्यांचे सोन्याचे दागिने, मोबाईल, हातातले घड्याळ व इतर महागड्या वस्तू घेऊन पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत.
असाच प्रकार काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत पंचरत्न लॉजमध्ये घडला आहे. तक्रारदार शार्दुल मोरे (28) यांची अरुणिमा (27 ) यांच्यासोबत डेटिंग ॲपवर ओळख झाली होती. त्यातून त्यांनी पार्टी करण्याचे ठरवून लॉजमध्ये जाण्याचे ठरवले. त्यानंतर तक्रारदार हे पार्टीमध्ये दारू पिले. त्यानंतर झोप लागताच आरोपी अरुनिमा हिने एक तोळा वजनाची सोन्याची चैन व 20 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व पावर बँक आणि इअरफोन घेऊन फरार झाली. यानंतर तक्रारदाराने काशिमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अशाच प्रकारचा गुन्हा दोन दिवसांपूर्वी मांडवी पोलीस ठाण्यात सुद्धा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात देखील आरोपी अरुनिमा व तिची साथीदार बिमलादेवी उर्फ हनी या होत्या. तिथेही त्यांनी फसवणूक केली आहे. दोन्ही प्रकरणात मिळून तीन तोळे सोने व दोन मोबाईल व एक घड्याळ असे मिळून तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
याप्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय गंभीरराव तपास करत आहेत.फसवणुकीच्या या प्रकारांमुळे काशिमीरा परिसरात खळबळ माजली आहे. अशा प्रकारांमुळे युवकांनी सावध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.