

पालघर ः बुलेट ट्रेन प्रकल्प कामादरम्यान रासायनमिश्रित पाणी तलावात मिसळल्याने तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याची घटना मायखोप परिसरात घडली आहे. तलावातील पाणी प्रदूषित झाल्याने परिसरातील शेतीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे स्थानिकांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पालघर तालुक्यातील मायखोप येथील युवक बिगेश जगन्नाथ भोईर यांनी जिल्हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे विभागाच्या पाझर तलावाचा लिलाव पाच वर्षांसाठी करारावर घेतला होता. करार तत्वावर घेतलेल्या या तलावात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी त्यांनी ऑक्टोबर 2024 पासून मत्स्य बीज, जाळी, खाद्य व राखणदारी यासाठी तब्बल सहा ते सात लाख रुपये खर्च केले.
व्यवसाय करण्यासाठी केलेला खर्च त्यांनी कर्ज काढून केला असल्याचे कळते. मात्र, तलावाच्या पूर्वेकडे असलेल्या रोठे गावातील बुलेट ट्रेन यार्डमधून रासायन मिश्रित पाण्याची गळती होऊन हे पाणी नाल्याद्वारे थेट पाझर तलावात गेले. यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले असून तलावातील मासे मृत्युमुखी पडले.
तलावातील मासे मृत झाल्याने मत्स्य व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या भोईर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. प्रशासन, प्रकल्प अधिकारी, लोकप्रतिनिधींनी घडलेल्या घटनेची दखल घेऊन प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त युवक बिगेश भोईर यांनी केली आहे.