

वाडा : वाडा शहरात मागील 27 दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत असून हक्काच्या जमिनीतून विविध कंपन्यांचे विद्युत टॉवर मनमानी पद्धतीने उभारले जात आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. एक जिल्हा, एक भाव या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर 7 ऑक्टोबर पासून शेतकरी बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे आमगाव गावातील तरुण रोजगारासाठी सात दिवसांपासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत. दोन्ही आंदोलनांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असून शासन इतके असंवेदनशील कसे असा आंदोलकांचा सवाल आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड व वाडा तालुक्यातून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे मनोरे उभारण्याचे काम सुरू असून वेगवेगळ्या भागात भिन्न भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आंदोलनाचा आरोप आहे. शेतकऱ्यांना समान भाव मिळावा या मागणीसाठी धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून शेकडो शेतकरी एकत्र येऊन बिऱ्हाड मोर्चात सहभागी आहेत. 27 दिवस उलटूनही आंदोलनाची कोणतीच दखल शासन घेत नाही मात्र कितीही अंत बघितला तरी आंदोलन न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील असा इशारा शेतकरी नेते मिलिंद पष्टे यांनी दिला आहे.
आमगाव ग्रामपंचायत हद्दीत एका कंपनीत परिसरातील सुशिक्षित व तज्ञ तरुण रोजगार मागतात मात्र कंपनी त्यांना काम देण्यास तयार नाही. व्यवस्थापकांच्या मुजोरीमुळे स्थानिक मराठी तरुण रोजगारासाठी भटकत असून याविरोधात आवाज उठविण्यासाठी तरुणांचे 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.
महावितरण कंपनीची मनमानी, रस्ते मंजूर नसतानाही केलेल्या खोदकामाची डोकेदुखी तसेच ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही वरिष्ठांना चुकीचा अहवाल पाठविण्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे.नरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज गोवारी, विलास बरड व गोविंद कातारे हे तरुण या उपोषणात सहभागी असून शेकडो ग्रामस्थ पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले आहेत.दरम्यान या आंदोलकांकडे प्रशासन गांर्भीयाने लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.