

ठाणे ः अनुपमा गुंडे
पुणे जिल्ह्यातील नाणे येथे ज्येष्ठ कलावंतांसाठी वृद्धाश्रम उभारण्याकरिता दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे 2 एकर जागा दिली होती. या जागेवर 100व्या नाट्य संमेलनाच्या समारोपापूर्वी वृद्धाश्रमाची पायाभरणी करण्याची राज्याचे मराठी भाषा मंत्री व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी केलेली घोषणा हवेतच विरली आहे, ती केवळ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा वाद न्यायालयीन कचाट्यात असल्याने महामंडळाला या जागे संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने राज्य शासन अनुकुल असतानाही या वृद्धाश्रमाचे घोंगडे भिजत पडले आहे.
चित्रपट, नाट्य आणि मालिका विश्व हे रोजगारासाठी बेभवरशाचे आहे, वाढती स्पर्धा, उत्पन्नाची अनिश्चितता आणि कौटुंबिक कलहांमुळे अनेक ज्येष्ठ कलाकारांना आयुष्याचा सांजकाळ हलाखीत व्यथीत करावा लागतो, त्यामुळे ज्येष्ठ कलावंतांच्या आयुष्याची परवड होऊ नये यासाठी अभिनेते विक्रम गोखले यांनी 2020मध्ये पुण्याजवळील नाणे येथील आपल्या मालकीची दोन एकर जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी दिली होती. या जागेवर शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या रत्नागिरी येथे होणाऱ्या सांगता सोहळ्यापूर्वी वृद्धाश्रमाचे भूमिपूजन होईल, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी दिले होते.
विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे वर्षभरापासून 100व्या नाट्य संमेलनाचा समारोप लांबला तरी या जागेचे भूमिपूजनही होऊ शकले नाही, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीचा वाद 2016 पासून पेटला आहे. सुमारे 45 हजारांच्या घरात सदस्य असलेल्या महामंडळाच्या काही सदस्यांना मतदान हक्क न मिळाल्याने निवडणूकीचा वाद आता उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.
ही निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने महामंडळाच्या काळजीवाहू कार्यकारिणीला कुठलेच निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने ज्येष्ठांच्या वृद्धाश्रमाला महाराष्ट्रात मध्यवर्ती भागात जागा मिळालेली असतांना त्याची वास्तू उभी राहू शकत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा वाद न्यायप्रविष्ट आहे, पण याबाबत लवकरच निकाल अपेक्षित आहे. दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी महामंडळाकडे दिलेल्या जागेवर काळजीवाहू कार्यकारिणी निर्णय घेऊ शकत नाही; परंतु सरकार वृद्धाश्रम उभारणी संदर्भात अनुकुल आहे, त्यामुळे महामंडळाची कार्यकारिणी अस्तित्वात आली की, या कामाला प्राधान्य देण्यात येईल.
मेघराज भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ