

मुंबई : साडीची लिंक पाठवून बीट कॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका महिलेची पावणेतेरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पश्चिम सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला अंधेरी येथे राहत असून ती एका खासगी कंपनीत सहाय्यक अकाऊंटट म्हणून काम करते. जूनमध्ये तिला सोशल मिडीयावर एका साडीची जाहिरात दिसली होती. त्यामुळे तिने त्या जाहिरातीची लिंक ओपन केली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर तिला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. त्यात अनेक सभासद होते. संबंधित सभासदांना बीट कॉईनमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले जात होते. बीट कॉईनमध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करावी, त्यातून त्यांना किती फायदा होईल याबाबतची माहिती दिली जात होती.
काही दिवसांनी तिला ग्रुप ॲडमिनने बीट कॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. चांगला परतावा मिळत असल्याने तिने जून 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत बीट कॉईनमध्ये पावणेतेरा लाखांची गुंतवणूक केली. त्यात तिला काही दिवसांत एक कोटीचा फायदा झाला. त्यामुळे तिने ती रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार प्रयत्न करुनही तिला ती रक्कम ट्रान्स्फर करता आली नाही. त्यामुळे तिने कस्टमर केअरला कॉल केला.
यावेळी तिला ही रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी आधी टॅक्स भरावा लागेल, असे सांगण्यात आले. संबंधित व्यक्ती तिला सतत टॅक्ससह इतर चार्जेस भरण्यास सांगत होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या मैत्रिणीसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी तिची फसवणूक झाल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिने पश्चिम सायबर सेल पोलिसांत तक्रार केली.