स्पेशल मदर्स!

Parenting a disabled child
स्पेशल मदर्स!file photo
Published on
Updated on

ज्योती मुळ्ये

सुशिक्षितांपेक्षा अडाणी माणसं परवडतात. ती किमान आमच्याकडे निखळ मायेनं तरी पहातात. पण, सुशिक्षितांच्या नजरेतली सहानुभूती, दया व अनेकदा डोकावणारी घृणा काळजात डाचते. एखादं दिव्यांग मूल घेऊन जगणं, त्याला आपल्यासोबत सांभाळणं यातला द्राविडी प्राणायाम सांगून समजण्यातला नाही. ते भोग फक्त भोगून संपवावे लागतात. समाजापायी काहीवेळा ते क्लेशदायकही ठरतं. असं एखादं स्पेशल चाईल्ड वाढवताना सर्वाधिक भोग येतात आईच्या वाट्याला. कारण आता ते फक्त तिचं मूल असतं. तिची चूक! तिचा जेनेटिक प्रॉब्लेम! तिनं प्रेग्नन्सीत केलेली हेळसांड! तिच्यातून आलेली उणीव! लोक आम्हांला दूषणं द्यायला काहीही असंबंध कारणं वापरतात, कधीकधी घरचे देखील!

दिव्यांग मूल पदरात आल्यावर आयुष्याची होरपळ हसत सहन करणाऱ्या एका आईने तेव्हा मात्र मनातला हंबरडा मोकळेपणाने फोडला. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात काही विशेष लेकरांच्या माय आपापल्या लेकरांसह आल्या होत्या. त्यांचं कौतुक करावं आणि जे काही त्या करतायत त्याबद्दल त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी म्हणून एका सहृदयी संस्थेने अगत्यानं बोलावलेले हे विशेष निमंत्रित. विशेष मूल पदरात पडलं म्हणून जगाच्या बोचऱ्या नजरा सहन करणाऱ्या, अनेकदा कुटुंबाकडूनही बोलणी खाणाऱ्या या आयांचं बोलणं खासकरून ऐकण्यासाठी!

Parenting a disabled child
ज्योतिर्भास्करांची ग्रंथसंपदा

त्यांना एक मोकळा व्हॉईस देण्यासाठी! मुळात आई झालं की, चोवीस तासांची जी ड्युटी लागते ते अनुभवलेल्या कित्येकजणी इथे होत्या. त्यामुळे या विशेष निमंत्रित बायांना, खरंतर, आपल्या कित्येक पटींनी आईपण सोसणाऱ्या, निभावणाऱ्या या अष्टौप्रहर आयांना ऐकताना आपण अगदी दगड असलो तरीही काळीज दाटल्याशिवाय राहत नाही. आपल्याच हाडामांसाचं, आपलीच प्रतिकृती असणारं आपलं मूल कुठल्याही आईला प्राणप्रियच! पण ते असं आयुष्यभरासाठी परावलंबित्वाचं ओझं घेऊन जन्माला यावं यासारखं त्या आईचं दुर्दैव नाही.

देवानं आपल्या पोटी मूल देऊन कुस उजवली म्हणून त्याचे आभार मानावेत की त्याला सुदृढ जगणं नाकारल्याबद्दल त्या जगन्नियंत्याला खडसून जाब विचारावा त्या आईनं, असं वाटतं राहतं प्रत्येक क्षणी ती मायलेकरांची जोडी पाहताना. म्हणून मला नेहमी वाटतं, या मुलांना जसं स्पेशल चाईल्ड म्हणतात ना, तसं त्यांना जीवापाड जपणाऱ्या, आपलं अख्खं आयुष्य, हौसमौज खुंटीला टांगून त्या देवाच्या पिलांना आयुष्यभर जोजवणाऱ्या आयांना पण स्पेशल मदर हा किताब समाजाने बहुमानाने बहाल करायला हवा.

ॲबनॉर्मल लेकरू पदरी आल्यानंतर सर्वात जास्त होलपट होते ती आईची! दिवसाचे चोवीस तास, तासाची साठ मिनिटं आणि मिनिटातले प्रत्येक साठ सेकंद... आयुष्य बांधलं जातं तिचं अशा लेकराशी. आयुष्यातले सगळे आनंद संपतात. ती फक्त आणि फक्त मुलाशी जोडली जाते. आणि याबद्दल बरेचदा तिच्या पदरी अनेकदा वंचना आणि कुचेष्टा पडते. ते तिच्या स्वसन्मानाला अधिक दुखावणारं असतं.

Parenting a disabled child
माऊली

खूप पूर्वी माझी एक मैत्रीण मला म्हणाली होती, प्रत्येक आईला आपलं मूल सुंदरच दिसतं गं! माकडसुद्धा आपल्या पिल्लाला पोटाशी कवटाळून फिरतं, आपण तर माणसं आहोत. आईसाठी आपलंच मूल सुंदर आणि सर्वोत्तम असतं. परवाच्या कार्यक्रमाचं निमित्त झालं, पण आपल्या मुलांसाठी समाजाकडून सन्मानाची, समान वागणुकीची अपेक्षा करणाऱ्या त्या आयांचा टाहो यासाठीच असतो नेहमी... खरं सांगू, हसत-खेळत जगणाऱ्या आनंदी कुटुंबात जेव्हा एखादं मतिमंद मूल जन्माला येतं ना, तेव्हा त्या कुटुंबाचंच नाही तर अख्ख्या घरदाराचं सुखाचं आयुष्य करपून जातं. मतिमंद मूल वाढवणं ही तारेवरची कसरत असते.

या मुलांची अपुरी बौद्धिक वाढ आणि वेगवेगळ्या स्तरावरचा बुद्ध्यांक याच्याशी लढताना पालकांची होरपळ निश्चित असते. अशा कुटुंबाचं सुखी समाधानी जीवन तर संपुष्टात येतंच, पण मुलांना सांभाळताना आणि समाजाच्या उपहासात्मक, कुतूहलजनक नजरेचा सामना करताना पालकांची होणारी ओढाताण, जीवाची घालमेल आणि भविष्याची चिंता शब्दातीत असते. अशी अडवणूक करणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाताना कितीही प्रकारच्या अग्निदिव्यातून गेलं तरीही आपल्या पश्चात काय? हा प्रश्न सुटत नाही.

आपल्याच आतड्याची माया आपल्या पश्चात बेभरवशी सोडायला आईबापाचं काळीज तयार होत नाही. फक्त अशाच वेळी एखाद्या आईच्या तोंडून वेदनोद्गार निघतो, “देवा, कुणालाही असं मूल देऊ नको!” अन्यथा त्यांच्यासाठी त्यांची मुलं देवदूतच असतात आणि त्या? बुद्धीने कायम छोट्या राहणाऱ्या देवदूतांचं संगोपनाची खास जबाबदारी देवाने सोपवलेल्या, स्पेशल मदर्स!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news