

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
ज्ञान, योग, दान, दम या चार सद्गुणांविषयी चर्चा करताना त्यांची परस्पर सांगड खूप महत्त्वाची ठरते. ज्ञानाशिवाय योग कळत नाही, योगाशिवाय शरीर धर्म समजत नाही, इंद्रियावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य अंगी येत नाही. दान आणि दम यासाठी योग पार्श्वभूमी ठरतो. या सद्गुणांचा अभ्यास जसा आध्यात्मिकास अत्यावश्यक, तसाच प्रापंचिकास. जसा प्रापंचिकास तसाच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रात कार्य करण्यास उत्सुक असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा. सद्गुणांची उपासना, अभ्यास आणि त्याचा स्वीकार, अंगीकार करत पुढे जाणारे महानुभाव समाज, देश, राष्ट्र किंबहुना जगास दिशा देण्याचे कार्य करून अजरामर होतात.
॥ श्री ॥
“संयम” हा सद्गुण “दम” याचाच भाग आहे. संयमाने अनेक गोष्टी जीवनात केल्यास जगताना “चुकीचे” प्रमाण कमी होण्यास मदत होते. वैराग्य ही संयमाच्या पुढील पायरी. इथे इंद्रियाचं दमन करण्याचं सामर्थ्य. जे माझे नाही ते मी स्वीकारणार नाही, याविषयी असणारी कठोर भूमिका. इंद्रिय दमनामधून ती ठोस तयार होते. यानंतरचा पुढचा सद्गुण -
यज्ञ :- आप-आपल्या श्रद्धेनुरूप ईश्वराची मनोभावे उपासना करून, त्याची भक्ती करणे. यज्ञ म्हणजे देवपूजा, अर्पण, त्याग करणे होय. थोडक्यात, स्वहितापेक्षा व्यापक कल्याणासाठी केलेला पवित्र त्याग म्हणजे “यज्ञ”. यज्ञाचसाठी केलेलं प्रत्येक कर्म हे यज्ञच आहे. यज्ञाचे मुख्य तीन अर्थ- 1) दैवी / वैदिक यज्ञ :- अग्नीत हवी (तूप, समिधा, औषधी द्रव्य) 2) कर्म यज्ञ (गीतार्थ):- निस्वार्थ भावनेनं केलेलं प्रत्येक कर्म हे यज्ञच आहे.
3) आध्यात्मिक यज्ञ ः- अहंकार, आसक्ती, लोभ, क्रोध यांचा त्याग (आहुती देऊ न) करून स्वतःला ईश्वरार्पण करणे. हाच खरा यज्ञ. यज्ञ म्हणजे दान, सत्यवचन, संयम, स्वकर्तव्य पालन इ. सद्गुणांचा ध्यास तर दुर्गुणांचा सर्वथा, सर्वत्र त्याग !!!
तप:- यज्ञानंतर माऊली तप या सद्गुणांंच्या बाबतीत निरुपण करतात. “तप” हा संस्कृत शब्द “तप” या धातूपासून झाला आहे. तप् म्हणजे तप्त होणे, शुद्ध होणे, तेज निर्माण होणे. “स्व-इच्छांना नियंत्रित ठेवून, शुद्ध उद्देशाने केलेला आत्मसंयम म्हणजे “तप”. तप म्हणजे कडक व्रत, उपास-तापास, शारीरिक कष्ट नव्हे तर मन, वाणी आणि शरीर यांना शिस्त लावणे हेच खरे तप.
1) शारीरिक तप:- देव, गुरू, माता-पिता यांचा सन्मान करत ब्रह्मचर्य, अहिंसा, साधेपणा, स्वच्छतेला अंगीकारणे.
2) वाणीचे तप :- सत्य, मधुर हितकारक बोलणे, शांत, संयमित भाषा कुणालाही दुखावणार नाही अशी वाणी.
3) मानसिक तप:- मौन, इंद्रियनिग्रह, भावनांवर नियंत्रण, मनाची शुद्धता, पवित्रता, समाधान वरीलप्रमाणे तपाचरण होय.
माऊली “तप” या शब्दाला आणखी धार आणतात -
तैसे देहजीवांचिये मेळणीं| जो उदयजत सूये पाणी|
तो विवेकु अंतःकरणी | जागवी जो ॥
जागते रहो !!! हा नारा सतत जो विवेकास देतो. ज्याचा विवेक “देह” आणि “आत्मा” या दोहोंना स्वतंत्रपणे जाणतो. मानवी जीवनातील प्रत्येक कर्तव्य-कर्मावर प्रथम “विवेकाच्या उजेडात” पडताळणी केली जाण्याची ज्यात क्षमता प्राप्त होते. त्या क्षमतेला, ताकदीला “तप” म्हणतात. क्षणोक्षणीची जागृतता बाळगणे हा अत्यंतिक अभ्यासाचा भाग आहे. हा सद्गुण प्राप्त करण्यासाठी मानवाला प्रचंड साधना करावीच लागेल. आत्मतत्त्वाचा विचार “तप” साधनेतून जागृत झाला असता “बुद्धीची” विषयांकडील धाव थांबली जाते. एकूणच बुद्धीची जागृती ही बाब ज्ञान-कर्मेंद्रियांच्या आवडीच्या विषयाप्रतीची ओढ नाहिशी करण्यास महत्त्वाची आहे.
आपण दैवी संपत्तीचा सध्या अभ्यास करत आहोत. आध्यात्मात बुद्धीप्रामाण्याला विज्ञानापेक्षाही अधिक महत्त्वाचे स्थान दिलेले आहे, ही बाब मी मुद्दाम अधोरेखित करत आहे. आध्यात्मिक विचारधारा अधिक प्रगल्भ आणि सखोल आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की “वैज्ञानिक” तथ्यांना आध्यात्मात स्थान नाही. उलटपक्षी वैज्ञानिक तथ्यांना अध्यात्मात अधिक सखोलतेने कसे अभ्यासावे यांचे “साधन” सापडण्यास मदत होईल. सद्गुण विचारांना आणि त्यांच्या अभ्यासास विज्ञानाने नाकारण्याचे काहीच कारण नाही. उलटपक्षी विज्ञानाने सद्गुण मार्गाने केलेली प्रगती “विश्वशांती” आणि “सृष्टीचा विकास“ यांकडे अत्यंतिक संवेदनशील पाहण्याची दृष्टी देईल.
“अध्यात्म” मानवी जीवनातील सर्व पातळ्यांवर पोषक वातावरण निर्माण करून सृष्टीच्या कल्याणाचाच विचार करणारं शास्त्र आहे. “विज्ञान” हे मानवी सृष्टी जीवनात दुधारी तलवार म्हणून विनाशक ठरू शकते आणि म्हणूनच विश्वातील बुद्धिवंत, विचारवंत, प्रज्ञावंत, शिक्षणप्रेमी, मानवतावादी यांनी एकत्र येऊ न सद्गुण उपासनेचा अभ्यास शिक्षणप्रक्रियेत अंतर्भूत करणे अत्यावश्यक ठरते.
सद्गुणांची उपासना ही कोणत्या एका विचार, संप्रदाय, धर्म, राष्ट्र, परंपरा यांच्याशी निगडित नसून ती अवघ्या विश्वाच्या कल्याणाची एकमेव बाब आहे, याचा विसर हा किमान मानवास तरी परवडणारा नाही. आणि म्हणूनच श्री ज्ञानदेवांनी मांडलेले हे “सद्गुण” दैवीसंपत्तीचा विचार हा अधिका-अधिक विस्तृत प्रमाणात प्रचारास आणून त्याचा सुगंध देशोदेशीच्या प्रज्ञावंतापर्यंत जाण्यासाठी तुम्हा-आम्हास प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आर्जव :- सर्व प्राणीमांत्रांविषयी अत्यंत सौजन्यपूर्ण आचरण ठेवणे, या सद्गुणांस “आर्जव” म्हणतात. सद्यस्थितीत मानव प्राणी असा विचार करून वागतो आहे, की सृष्टी फक्त “मानव” ह्या एकाच प्राणीमात्रासाठी निर्माण झाली आहे. पशु-पक्षी, किटक-जीव-जंतू यांना या सृष्टीत राहण्याचा कोणताही हक्क नाही, असा आमचा नित्यव्यवहार आहे; तिथे “आर्जव” हा संस्कार आमच्या पुढील पिढ्यांवर कसा होणार. मानवाने पिकवलेल्या शेतीवर फक्त मानवाचाच हक्क आहे;पशु-पक्ष्यांसाठी तिथे सापळे लावले जातात, किटक - मुंग्यांसाठी औषधं फवारली जातात. उंदीर-घुशी- सापांना तर शत्रू समजले जाते. तिथे “आर्जव” कसं सांभाळणार, हा सद्गुण अंगीकारण्यासाठी मानवास कसोसीने प्रयत्न करावे लागतील. हवा-पाणी- जमिनीवरील सर्व चराचरांना राहण्याचा, वास्तव्य करण्याचा समान अधिकार आहे.
हे प्रथम आम्हाला मान्य करावं लागेल आणि नंतर तसा आमचा व्यवहार व्हावा लागेल. हा संस्कार किंवा सद्गुण आम्ही गमवायला नको, कारण या सद्गुणांमुळे आमच्यातला “मानव”आम्हास सापडणार आहे. संत तुकारामांच एक वचन मला इथे स्मरते.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे | पक्षीही सुस्वरे आळविती ॥
येणे सुखें रुचे एकांताचा वास | नाही गुणदोष अंगा येत ॥
“आर्जव” हा सद्गुण अंगी बाळगवून निसर्गातील पशु-पक्ष्यांशी सदैव सौजन्यपूर्ण वागावे.
- रामकृष्ण हरी