ज्योतिर्भास्करांची ग्रंथसंपदा

सांस्कृतिक, धार्मिक आणि वाङ्मयीन इतिहासात ज्योतिर्भास्कर जयंत शिवराम साळगावकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
Jyotirbhaskar Salgaonkar
ज्योतिर्भास्करांची ग्रंथसंपदाpudhari photo
Published on
Updated on

डॉ. महेश केळुसकर

विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि वाङ्मयीन इतिहासात ज्योतिर्भास्कर जयंत शिवराम साळगावकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1929 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला आणि 20 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. साळगावकर हे केवळ एक नामवंत ज्योतिषी किंवा यशस्वी उद्योजक नव्हते, तर ते एक प्रगल्भ विचारवंत, इतिहासकार, लेखक आणि संपादक होते. केवळ दहावीपर्यंतचं औपचारिक शिक्षण झालेलं असूनही, त्यांनी आत्मबळावर आणि व्यासंगामुळे संपादन, कादंबरी लेखन, आध्यात्मिक विवेचन आणि पंचांग क्षेत्रात जे कार्य केलं, ते आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या अफाट साहित्य संपदेचा आढावा घेणे म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवासाचा अभ्यास करण्यासारखं आहे.

जयंत साळगावकरांच्या साहित्यिक प्रवासाची बीजं त्यांच्या कोकणातील बालपणात आणि तेथील समृद्ध लोकसंस्कृतीत दडलेली होती. मालवणसारख्या सांस्कृतिक केंद्रामध्ये जन्मल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच संस्कृत, ज्योतिष आणि संत वाङ्मयाची गोडी लागली. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात मालवणमधील ज्योती साप्ताहिकातून झाली, जिथं त्यांनी संपादनाचे प्राथमिक धडे गिरवले. पुढे मुंबईत स्थलांतरित झाल्यावर त्यांनी एका अग्रगण्य दैनिकात सहसंपादक म्हणून काम केलं. या काळात त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीला दोन अत्यंत लोकप्रिय घटक दिले. शब्दकोडे आणि दैनंदिन राशिभविष्य.

1958 ते 1972 या काळात त्यांनी लोकमित्र नावाचं साप्ताहिक चालवलं. साळगावकरांच्या दृष्टीने साहित्य हे केवळ अभिजनांपुरतं मर्यादित न राहता ते बहुजनांपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. याच विचारातून त्यांनी शब्दरंजन ही वाङ्मयीन शब्दकोड्यांची मालिका सुरू केली. ही शब्दकोडी मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखकांच्या अवतरणांवर आधारित असत, ज्यामुळे वाचकांना साहित्याची ओढ निर्माण झाली. वृत्तपत्रीय लेखनाच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषेला एक नवी शिस्त आणि सुबोधता प्राप्त करून दिली.

Jyotirbhaskar Salgaonkar
Crime News: मोशीत आर्थिक वादातून एकाचा खून; पाच जण अटकेत

साळगावकरांनी पारंपरिक पंचांगातील क्लिष्टता दूर करून ते सर्वसामान्यांच्या भाषेत मांडलं. त्यांनी कॅलमॅनॅक (उरश्रशपवरी + अश्रारपरल) ही संकल्पना रूढ केली. पंचांगातील घटिका आणि पळांचे रूपांतर तास आणि मिनिटांत करणे, ही एक मोठी तांत्रिक आणि वैचारिक क्रांती होती, ज्याने ज्योतिषशास्त्राला विज्ञानाच्या चौकटीत आणून बसवलं.

कालनिर्णयच्या यशामध्ये त्याच्या वाङ्मयीन गुणांचा मोठा वाटा आहे. प्रत्येक महिन्याच्या पानाच्या मागे साळगावकरांनी आरोग्य, पाककला, इतिहास, आणि साहित्यावर आधारित लेख देण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतः अनेक लेख लिहिले आणि तत्कालीन नामवंत साहित्यिक, कवी आणि समीक्षकांकडून दर्जेदार मजकूर लिहून घेतला. यामुळे कालनिर्णय हे केवळ भिंतीवर टांगण्याचं पंचांग न राहता ते घरातील प्रत्येकासाठी वाचनीय असं वार्षिक नियतकालिक बनलं.

जयंत साळगावकरांच्या साहित्य संपदेतील एक महत्त्वाची कादंबरी म्हणजे सुंदरमठ. ही कादंबरी समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित आहे. समर्थांच्या जीवनातील केवळ आध्यात्मिक पैलू न मांडता, त्यांनी समर्थांच्या संघटनात्मक कौशल्याचं आणि त्यांनी स्थापन केलेल्या मठांच्या जाळ्याचं प्रभावी चित्रण केलं आहे. साळगावकरांचा संत वाङ्मयाचा व्यासंग या कादंबरीतून पानोपानी प्रत्ययाला येतो. समर्थांनी शिवकाळात केलेलं राष्ट्रजागृतीचं कार्य आणि सुंदरमठ (चाफळ) येथील त्यांचं वास्तव्य याला साळगावकर यांनी कादंबरीच्या माध्यमातून जिवंत केलं. ऐतिहासिक संदर्भांची अचूकता आणि ओघवती भाषा ही या कादंबरीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. साळगावकरांच्या लेखणीतून उतरलेला हा ग्रंथ केवळ एक कादंबरी नसून तो महाराष्ट्राच्या एका संघर्षाचा आणि भक्तीचा इतिहास आहे.

साळगावकरांचे श्रीगणेश दैवतावर विशेष प्रेम आणि गाढा अभ्यास होता. त्यांनी देवा तूची गणेशु हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथात श्रीगणेश या दैवताचा उगम, इतिहास, त्याचं पौराणिक स्वरूप आणि समाज जीवनावरील त्याचा प्रभाव यांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. याच विषयावरील त्यांचं दुसरं पुस्तक म्हणजे गणाधीश जो ईश. हे पुस्तक साळगावकरांनी विविध वृत्तपत्रांतून लिहिलेल्या लेखांचा आणि त्यांच्या मुलाखतींचा संग्रह आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे माजी ट्रस्टी म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव आणि गणपतीच्या मूर्तीविज्ञानाबद्दलचा त्यांचा अभ्यास या साहित्यातून प्रकट होतो.

साळगावकरांचं आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात मोठं योगदान म्हणजे देवाचिये द्वारी ही ग्रंथमालिका. संत ज्ञानेश्वरांच्या “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी” या वचनावरून या मालिकेचं नाव ठेवण्यात आलं आहे. मुळात ही मालिका 309 लेखांच्या संग्रहापासून सुरू झाली, पुढे तिचे अनेक खंड प्रकाशित झाले.

या ग्रंथमालिकेत त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम व इतर महान संतांच्या अभंगांचं आधुनिक संदर्भात विवेचन केलं आहे. क्लिष्ट आध्यात्मिक विचार सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांशी कसे जोडलेले आहेत, हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत मांडले. त्यांच्या या लेखनामुळे वारकरी संप्रदायाचा आणि संत साहित्याचा ठेवा सुशिक्षित मध्यमवर्गीयांच्या अभ्यासाचा विषय बनला. ‌‘रस्त्यावरचे दिवे‌’ या पुस्तकात साळगावकरांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्यक्ष घटना आणि अनुभवांचं भावपूर्ण चित्रण केलं आहे. हे लेखन त्यांच्या संवेदनशील आणि निरीक्षणशील वृत्तीचं दर्शन घडवतं.

साळगावकरांचं साहित्यिक कार्य केवळ लेखनापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या सांस्कृतिक, साहित्यिक संस्थांचं नेतृत्व केलं. त्यांच्या कार्याची व्याप्ती इतकी मोठी होती की, त्यांना ‌‘ज्योतिर्भास्कर‌’ पदवीसह समाजाने एक सांस्कृतिक राजदूत म्हणून मान्यता दिली.

ज्योतिर्भास्कर साळगावकर काका आणि माझे वैयक्तिक साहित्य स्नेहसंबंध होते. दादरच्या हिंदू कॉलनीमधील त्यांच्या घरी ज्या ज्या वेळी मी जायचो त्या त्या वेळी साळगावकर काकी माझ्यासमोर बेसनलाडू आणून ठेवायच्या आणि मग काव्यवाचनाचा आग्रह व्हायचा. माझ्या मालवणी कविता ऐकण्यासाठी जयराज, त्यांची पत्नी आणि मुलगी शक्ती हेही हजर असायचे. माझा एखादा लेख खूप आवडला तर ज्योतिर्भास्कर फोन करून त्यांच्या दादरच्या कालनिर्णयच्या ऑफिसमध्ये बोलावून घ्यायचे आणि भला मोठा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करायचे. सोबत रोख रक्कम बक्षीस देऊन आशीर्वाद द्यायचे.

Jyotirbhaskar Salgaonkar
Heavy vehicles entry ban : मुंबईत आजपासून गर्दीच्यावेळी सर्व जड वाहनांना प्रवेशबंदी!

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर आम्ही त्यांची संत साहित्यावरील भाषणांची मालिका एक महिनाभर चालवली तेव्हा रेकॉर्डिंगला येताना प्रत्येक वेळी ते आपल्या सोबत मालपोवे घेऊन यायचे आणि मधल्या सुट्टीत आमच्या सगळ्या स्टाफला खाऊ घालायचे. वडीलकीच्या नात्याने त्यांनी मला अनेक वेळा दटावलेलं आहे. आपली माणसं जरा जरी चुकत असली की त्यांना मानसिक त्रास होत असे आणि तो ते व्यक्त करायचे. ग. दि माडगूळकर, सी. रामचंद्र, बाळासाहेब ठाकरे, राज आणि उद्धव ठाकरे, जयवंत दळवी, एकनाथ ठाकूर, विलासराव देशमुख, अशा मोठ मोठ्या लोकांनी आणि हजारो सामान्य वाचकांनीही ज्योतिर्भास्कर साळगावकर यांच्या साहित्य संपदेवर प्रेम केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news