

कसारा : ठाणे जिल्हातील अस्नोली गावातील तळेपाडा येथे अन्नातून विषबाधा झाल्याने तीन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलींची नावे काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी आहेत.
सोमवारी (२१ जुलै) या तिघींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्यांची आई संध्या भेरे यांनी प्रथम अस्नोली येथील खासगी डॉक्टरकडे, नंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने काव्या आणि दिव्या यांना मुंबईच्या नायर रुग्णालयात, तर गार्गीला नाशिकजवळील एसएमबीटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघींचाही मृत्यू झाला. काव्याचा गुरुवारी (२४ जुलै) रात्री, दिव्याचा शुक्रवारी (२५ जुलै) सकाळी, तर गार्गीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सुरू आहे.