

ठाणे : शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मुंबईत 50 टक्के, तर ठाण्यातील 70 टक्के जागांवर दावा केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे भाजप जेव्हा महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविते तेव्हा सत्तेत येते, आता केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे ट्रिपल इंजिनचे सरकार हवे, हे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले मुंबईतील आजचे विधान म्हणजे शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा तर नाही ना ? अशी चर्चा रंगू लागली आहे.
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते. विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकतर्फी यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील मित्रपक्ष स्वबळाची भाषा करताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढून शिवसेनाला काट्याची टक्कर दिली होती. मुंबईच्या 227 जागांपैकी शिवसेनेने 84 आणि भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. मात्र सत्तेच्या तडजोडीत मुंबईचे महापौरपद शिवसेनेकडे कायम ठेवण्यात आले होते.
आता शिवसेना कमजोर होऊन ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना असे दोन गट झाले आहेत. असे असतानाही शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतील निम्म्या म्हणजे 113 जागांवर, तर ठाण्यात 131 जागांपैकी 91 जागांवर दावा केला आहे. हा दावा मान्य करण्यास भाजपची तयारी नसून मुंबईच्या बदल्यात ठाणे व अन्य जिल्ह्यांतील महापालिकांमध्ये तडजोडीचे प्रस्ताव पुढे येऊ लागले आहेत. शिवसेनेचा 70 टक्के जागांचा फॉर्म्युला मान्य झाल्यास 23 नगरसेवक असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला नगण्य जागा येतील. त्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केवळ डबल इंजिनचे सरकार नव्हे, तर ट्रिपल इंजिनचे सरकार आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. 2014 मध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविली आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला. आता केंद्र, राज्याप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये भाजपची सत्ता हवी, त्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून कामाला लागा, असे आदेश अमित शहा यांनी दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या आदेशाचा अर्थ काय, अशी नवीन चर्चाही महायुतीमध्ये रंगू लागली आहे.
निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी
नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये भाजपची एकहाती सत्ता असल्याने शिवसेना सोबत नको, अशी भावना स्थानिक भाजप नेत्यांची आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी तर थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांना अंगावर घेतले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपची ताकद असल्याने गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापुढे चालून आली आहे. उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार महापालिकांमध्ये महायुतीमध्ये निवडणुका लढविल्या जातील. सेनेच्या फुटीमुळे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजपचे पारडे जड असल्याने शिवसेनेला जागावाटपात वरचढ होण्यास संघर्ष करावा लागेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.