

मुंबई : राज्यात डबल इंजिन सरकार असले, तरी त्यावर मी समाधानी नाही. मला येथे ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. त्यासाठी येत्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विरोधकांचा सुपडासाफ करा. त्यासाठी झोकून देऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना करतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. याप्रसंगी त्यांनी देशात आता घराणेशाही असलेल्या पक्षांचे राजकारण चालणार नसल्याचेही निक्षून सांगितले.
चर्चगेट येथे प्रदेश भाजपच्या नवीन मुख्यालयाचे भूमिपूजन अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज भाजपची वाटचाल कुठल्याही कुबड्यांचा आधार न घेता सुरू आहे. स्वत:च्या बळावर भाजप उभा आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हा एक मजबूत पक्ष म्हणून दिसत असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.
यावेळी अमित शहा यांनी राजकारणातील घराणेशाहीवरून विरोधकांवर टीकेची झोड उठविली. अन्य सर्व पक्षांसाठी पक्ष कार्यालय ही केवळ वास्तू असते. भाजप कार्यकर्त्यांसाठी कार्यालय हे मंदिराप्रमाणे असते. भाजप हा एकमेव पक्ष आहे, जिथे बूथ अध्यक्ष हा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री हेही कार्यकर्त्यांमधूनच बनतात. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. लोकशाही मूल्यांच्या आधारे भाजपचा कारभार चालतो. लोकशाही पद्धतीने कारभार करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. जे पक्ष लोकशाही पद्धतीने काम करत नाहीत, ते देशातील लोकशाहीचे रक्षण कसे करणार? जो पक्ष लोकशाही मूल्यांवर चालतो, तोच पक्ष लोकशाहीचे खर्या अर्थाने रक्षण करू शकतो, असा टोलाही शहा यांनी घराणेशाहीवाल्या पक्षांना लगावला.
पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे मार्गी लावले
जनसंघाच्या काळापासूनचे वैचारिक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भाजपने मार्गी लावले आहेत. यात राम मंदिराची उभारणी असो, काश्मिरातील 370 चे कलम हटविणे, ट्रिपल तलाकवर बंदी घालणे, असे वैचारिक मुद्दे निकाली काढले आहेत. आज सर्वच आघाड्यांवर देश अव्वल बनत आहे. गरीब कल्याण, मोफत धान्यवाटप, मोफत वैद्यकीय सुविधांमुळे गरिबांचे जीवन सुकर केले आहे. अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकाची बनली आहे. देश बलशाली, आत्मनिर्भर आणि सुरक्षित बनला आहे. दहशतवादी हल्ले करणार्यांना जबर धडा शिकवला जात आहे. 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने काम करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांसाठी कार्यालय हे मंदिर
नव्या कार्यालयाच्या भूमिपूजनाने एक नवीन इतिहास लिहिला जात आहे. कार्यकर्त्यांसाठी कार्यालय हे एक मंदिर असते. 55 हजार चौरस फुटांची अतिशय भव्य-दिव्य ही कार्यालयाची प्रस्तावित इमारत पाहून मी प्रदेशाध्यक्षांना धन्यवाद देतो. या कार्यालयामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत. यात मुख्यमंत्र्यांचे कार्यालयदेखील असेल. पक्षाने सुरुवातीला एक बीज रोवले होते. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पाहून आनंद होतो आहे, असेही अमित शहा म्हणाले. सर्व शासकीय जिल्ह्यांतील भाजप मुख्यालयांची कामे ही डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होतील. जवळपास 660 संघटनात्मक जिल्ह्यांपैकी 375 जिल्ह्यांत कार्यालये आहेत आणि 90 ठिकाणी काम सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. आम्ही नेहमीच सिद्धांताच्या आधारे भूमिका घेत आलो आहोत. भाजपने भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व कार्यकर्त्यांना यानिमित्ताने मी शुभेच्छा देतो.