

मुरबाड शहर : किशोर गायकवाड
म्हसोबा खांबलिंगेश्वर यात्रेला शनिवारपासून सुरुवात झाल्याने मुरबाड शहरात रहदारीने उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. मात्र या वाढलेल्या गर्दीबरोबरच शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी अक्षरशः दृष्यमानता घसरल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. रस्त्यावरून चालणारा पादचारी असो वा दुचाकीस्वार, प्रत्येक जण धुळीच्या ढगांतून वाट काढताना दिसत आहे.
मुरबाड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या झपाट्याने सुरू आहे. मात्र या कामात मूलभूत सुरक्षानियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे. अवजड वाहने विना आच्छादन थेट खडी, माती व अन्य बांधकाम साहित्याची वाहतूक करत असून, या वाहनांमुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात धूळ उडत आहे. त्यातच शहराच्या प्रवेशद्वाराजवळ पुलाच्या कामासाठी करण्यात आलेले मोठ्या प्रमाणातील उत्खनन व मातीचे ढिगारे, ही समस्या अधिक गंभीर करत आहेत.
दिवसभर सुरू असलेल्या प्रचंड वाहनांच्या रहदारीमुळे धूळ हवेत उडतच राहत असून, याचा थेट फटका सामान्य नागरिक, प्रवासी, व्यापारी तसेच बंदोबस्तासाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना बसत आहे. डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे त्रास, खोकला, अॅलर्जी यांसारख्या समस्या वाढत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
म्हसोबा यात्रेसाठी लाखो भाविक मुरबाडकडे येत असताना, शहर धुळीच्या गर्तेत सापडणे ही प्रशासनाची गंभीर अपयशाची पावती आहे. एखादी मोठी दुर्घटना किंवा आरोग्याची गंभीर समस्या उद्भवल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
तातडीच्या उपाययोजना आवश्यक...
शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दिवसातून अनेक वेळा पाणी फवारणी बंधनकारक करावी. तसेच माती, खडी वाहतूक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना आच्छादन सक्तीचे करावे; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, पुलाच्या व महामार्गाच्या कामाजवळील मातीचे ढिगारे तात्काळ हटवावेत किंवा झाकून ठेवावेत, यात्राकाळात पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाने विशेष पथक नेमून पाहणी करावी, पोलिस, नागरिक व व्यापाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संरक्षणात्मक उपाय तातडीने राबवावेत, अशा विविध आवश्यक तातडीच्या उपाययोजना आखण्याची मागणी होत आहे.
प्रशासन झोपेतच; उपाययोजनांचा अभाव...
यात्रेसारख्या लाखो भाविकांची गर्दी असलेल्या काळात धुळ नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना राबवली जात नसल्याने "प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याचे काहीही देणेघेणे नाही का?" असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. ना नियमित पाणी फवारणी, ना मातीच्या ढिगाऱ्यांवर आच्छादन, ना अवजड वाहनांवर कारवाई, सर्वच पातळ्यांवर हलगर्जीपणा दिसून येत आहे.