

भाईंदर : आगामी पालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या त्रुटीयूक्त असल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. मिरा-भाईंदर महापालिकेकडून या मतदार याद्या अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आयोगाच्या निर्देशानुसार त्यात दुबार नोंदणी असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसे हमीपत्र त्या मतदारांकडून घेण्याचे काम सुरु असल्याचे नगरसचिव दिनेश कानुगडे यांनी सांगितले.
आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मिरा-भाईंदर महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्या त्रुटीयूक्त असल्याने त्यावर विविध राजकीय पक्षांसह इतरांनी आक्षेप घेतला आहे. या मतदार याद्या विधानसभा मतदार याद्यांच्या आधारे तयार करण्यात आल्या आहेत. मात्र शहरातील मिरा-भाईंदर व ओवळा-माजिवडा या दिड विधानसभा क्षेत्रात प्रभाग रचना करण्यात आल्याने अनेक इमारती वा लोकवस्त्या एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याचे प्रारूप मतदार याद्यांमध्ये आढळून आले.
यामुळे त्या प्रारूप मतदार याद्या सुधारण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली. तर त्यावर सुमारे 700 हुन अधिक हरकती नोंदविण्यात आल्याने त्यानुसार प्रारूप मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करून त्या अंतिम करण्याची मुदत गेल्या 27 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली होती. मात्र प्रारूप मतदार याद्या दुरुस्त करण्यासह त्याची पडताळणी करण्यास मोठा विलंब लागत असल्याने हरकती नोंदविण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी होऊ लागली. त्याची दखल घेत आयोगाने 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. तसेच प्राप्त हरकतींनुसार प्रारूप मतदार याद्यांत सुधारणा करण्यासाठी देखील विलंब लागत असल्याने आयोगाने त्याला देखील 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यावेळी प्राप्त हरकतींवर सुनावणी न घेताच प्रारूप तथा त्रुटीयूक्त मतदार याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. त्याच्या सुधारणेवेळी आढळून येणारी दुबार मतदार नोंदणीचे प्रमाण तूर्तास सुमारे 5 हजारांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. मतदानासाठी निवडलेल्या प्रभागातील मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश आयोगाकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बोगस मतदान करण्यापासून रोखता येणार
आयोगाच्या निर्देशानुसार दुबार नोंदणी असलेल्या मतदारांची नावे एकापेक्षा अधिक असल्याचे आढळून आल्यास ती सर्व नावे मतदार यादीतून न वगळता दुबार नावांपैकी एकाच नावावर संबंधित मतदारांना एकाच ठिकाणी (एकाच प्रभागात) मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसे हमीपत्र संबंधित मतदारांकडून लेखी स्वरूपात घेण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे. तर उर्वरीत दुबार नावांद्वारे त्या मतदारांना पुन्हा मतदान करता येऊ नये, यासाठी त्यांच्या दुबार नावांपुढे त्यांनी मतदारानासाठी निवडलेला प्रभाग व मतदार यादीतील त्यांच्या नावांचा अनुक्रमांक लिहिण्यात येणार आहे. यामुळे बोगस मतदान करण्यापासून रोखता येणार असल्याचे कानुगडे यांनी सांगितले.