

ठाणे : मुंबई-ठाणे-मिरा-भाईंदर परिसरातील वाहतुकीच्या श्वासात अडथळा ठरणाऱ्या घोडबंदर मार्गाला दिलासा मिळण्यासाठी पुन्हा आणखी एक बैठक नागपुर अधिवेशनात घेण्यात आली. त्यामध्ये गायमुख ते फाउंटन दरम्यानचा रस्ता रुंद करण्यासाठी वनविभागाचा अडथळा लवकरात लवकर दूर करा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
नागपूर येथील विधिमंडळात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, संबंधित विभागांचे सचिव तसेच ठाणे व मिरा-भाईंदर महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.
उपमुख्यमत्री शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक यांनी वारंवार बैठका घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्याचे निर्देश दिले होते. मात्र वाहतूक कोंडी काही फुटलेली नाही. ती वाढतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज अधिवेशनात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता गंभीर समस्या बनली आहे. ती सोडवण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या प्रलंबित प्रस्तावांची स्थिती, अडचणी आणि पुढील कार्यवाहीबाबत तातडीने निर्णय घ्यावा.”मिरा-भाईंदर आणि ठाणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा देणारा घोडबंदर रस्ता रुंदीकरण प्रकल्प हा काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत, सर्व अडथळे दूर करून कामाला गती देण्याचे स्पष्ट आणि कठोर निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
दोन्ही महापालिकांनी एक समन्वय अधिकारी नियुक्त करा
मिरा-भाईंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घोडबंदर ते फाउंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण व विकासकामांना गती देण्यासाठी वनविभागाचा ना-हरकत दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वनविभागाकडे सादर केले असले, तरी विभागाने सुचविलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा, असेही निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.