Dombivli Water Crisis: १५० एमएलडी पाणी तरी डोंबिवलीकर तहानलेले; पाणी वितरणात ‘गोलमाल’

अखेर या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची स्थायी समिती दालनात बैठक घेण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी दिले.
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

कल्याण: डोंबिवली पश्चिमेकडील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, पाणी वितरण व्यवस्थेतील दोष आणि अनियमित कारभारामुळेच नागरिकांच्या नळाला अपुरे पाणी येत असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला.

पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने भाजपचे स्थायी समिती सदस्य नंदू म्हात्रे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अखेर या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची स्थायी समिती दालनात बैठक घेण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी दिले.

Water Crisis
Vasai Panchayat Samiti: वसई पंचायत समितीला ताडपत्रीचा आधार; नवीन इमारतीला मुहूर्त कधी?

डोंबिवली पश्चिमेकडील ह प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही भागांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. हा प्रश्न नंदू म्हात्रे तसेच शिवसेना गटाचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

‘वारंवार प्रश्न मांडूनही अधिकारी दुर्लक्ष करतात, मग नागरिकांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय उत्तर द्यायचे?’ असा सवाल नंदू म्हात्रे यांनी उपस्थित केला. पाणीटंचाईबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार तसेच सातत्याने पाठपुरावा करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

डोंबिवली पश्चिमेकडील काही भागांना पालिकेच्या मधुबन जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा दाब आणि पुरवठ्याची नोंद ठेवण्यासाठी बसविण्यात आलेल्या फ्लो मीटरमध्ये १९५, २०० आणि २०५ इतका प्रेशर दाखविला जात आहे. मग प्रत्यक्षात नागरिकांना कमी पाणी का मिळते, असा सवाल सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना केला. मात्र, अभियंत्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने सदस्यांनी हा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत जोरदारपणे उपस्थित केला.

पाणीपुरवठा केंद्रातून पुरेसे पाणी, फ्लो मीटरवर योग्य प्रेशर; तरीही नागरिकांच्या नळाला पाण्याचा ठणठणाट—मग नेमके पाणी मुरतेय कुठे? हा सवाल आता डोंबिवलीकरांकडून उपस्थित केला जात आहे.

Water Crisis
Stamp Duty Abhay Yojana: उल्हासनगरच्या प्रलंबित मुद्रांक शुल्क अभय योजनेसाठी ३० दिवसांची मुदतवाढ

१४ लाख खर्चून जलवाहिनी; तरीही पाण्याचा ठणठणाट

डोंबिवली पूर्वेकडील रघुवीरनगर परिसरात तब्बल १४ लाख रुपये खर्च करून नुकतीच सहा इंची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, नवीन जलवाहिनी टाकूनही या भागातील पाणीटंचाई संपलेली नसल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. काही ठिकाणी अवघे १५ ते २० मिनिटे, तर काही ठिकाणी २५ ते ३० मिनिटेच पाणी येते.

त्यातही पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे. डोंबिवली शहराला नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज १५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रातून पुरेशा दाबाने पाणी सोडले जात असतानाही वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले.

‘वॉलमनच्या मर्जीने पाण्याचे वाटप?’

दरम्यान, काही भागांत पाणी वितरण करताना वॉलमनकडून कमी-जास्त प्रमाणात पाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेतील नेमका दोष कुठे आहे, याची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली.

अखेर स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत, येत्या दोन दिवसांत संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अभियंते आणि अधिकाऱ्यांची स्थायी समिती दालनात बैठक घेण्याचे निर्देश दिले. वितरण व्यवस्थेतील अडचणी शोधून त्या तातडीने दूर कराव्यात आणि नागरिकांचा पाणीप्रश्न निकाली काढावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news