

खानिवडे: वसई तालुका पंचायत समितीची जुनी व धोकादायक इमारत पाडून नवीन सुसज्ज इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पंचायत समितीचा कारभार गेल्या चार वर्षांपासून जुन्या कर्मचारी निवासस्थानांमधूनच सुरू आहे.
या मोडकळीस आलेल्या निवासस्थानांच्या मंगलोरी कौलंमधून पावसाचे पाणी गळत असल्याने कार्यालयांना सध्या ताडपत्रीचे छत देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नवीन इमारत मिळेपर्यंत पंचायत समितीच्या कारभाराला ‘ताडपत्रीचा आधार’ घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
वसई पश्चिम येथील वसई न्यायालय व तहसीलदार कार्यालयासमोर पंचायत समितीचे कार्यालय होते. सुमारे २ हजार ९८८ चौरस मीटर क्षेत्रात असलेल्या या इमारतीमध्ये आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, ग्रामीण रोजगार, स्वच्छता, पाणीपुरवठा, खादी ग्रामोद्योग, लघुपाटबंधारे आदी विविध विभागांची कार्यालये होती. मात्र, इमारत धोकादायक झाल्याने सुमारे साडेचार वर्षांपूर्वी ती रिकामी करण्यात आली. त्यानंतर यंदा काही महिन्यांपूर्वी ही जुनी इमारत भुईसपाट करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून या जागेवर नवीन इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नवीन इमारतीची जागा सध्या मोकळीच असून, मागील बाजूस असलेल्या जुन्या कर्मचारी निवासस्थानांमध्ये पंचायत समितीचे विविध विभाग चालविले जात आहेत.
ही कर्मचारी निवासस्थानेही जुनी असून लाकडी बांधकाम आणि मंगलोरी कौलं असलेल्या या इमारतींची अवस्था सुद्धा दयनीय झाली आहे. पावसाळ्यात कौलांमधून पाणी गळत असल्याने छतावर ताडपत्री टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करावे लागत आहे.
शिक्षण विभागासह काही विभाग वगळता आरोग्य विभाग, गटविकास अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास सेवा, पाणीपुरवठा, कृषी आदी विविध विभाग विखुरलेल्या व अपुऱ्या जागेत कार्यरत आहेत.
कार्यालयीन कागदपत्रे, महत्त्वाच्या फाईल्स व दस्तऐवज ठेवण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याने ते एकावर एक रचून ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी जागेची कमतरता भासत असून, विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही बसण्यास पुरेशी जागा उपलब्ध होत नाही.
नवीन इमारत कधी ?
यंदाचा पावसाळा निम्म्याच्यावर आला असतानाही नवीन इमारत उभारणीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नवीन इमारत नेमकी कधी उभी राहणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पंचायत समितीच्या कारभारासाठी कायमस्वरूपी आणि सुसज्ज इमारत उपलब्ध होणे गरजेचे असताना प्रशासनाकडून त्याबाबत ठोस हालचाली कधी होणार, याकडे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तूर्तास ताडपत्रीचे छप्पर!
नवीन इमारत उभी राहेपर्यंत पंचायत समितीचा कारभार याच जुन्या व गळक्या कर्मचारी निवासस्थानांतून सुरू राहण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात ताडपत्रीखाली सुरू असलेला हा कारभार पंचायत समितीच्या प्रशासकीय व्यवस्थेची दुरवस्था अधोरेखित करणारा ठरत आहे. या परिसरात संरक्षण विभागाचे कार्यालयही सुरू करण्यात आले आहे.
पंचायत समितीच्या इमारत निर्माणासाठी १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय येथे पाठवण्यात आला असून लवकरच मंजुरी मिळणार आहे. ती मिळाली की लागलीच या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येईल.
- एकनाथ ठाकरे, बांधकाम विभाग अधिकारी, वसई तालुका.