

ठाणे: उल्हासनगर शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी, ठाणे (ग्रामीण) यांच्या कार्यालयात 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३' अंतर्गत शासन निर्णयाच्या दिनांकास प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी, तसेच संबंधित पात्र पक्षकारांना देय मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विशेष बाब म्हणून ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राज्यातील दस्त निष्पादित केलेल्या जास्तीत जास्त पक्षकारांना दिलासा देणे, कमी पडलेले मुद्रांक शुल्क व त्यावरील दंडाच्या रकमेत सवलत देणे आणि शासनाचा महसूल जमा करण्याच्या उद्देशाने "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३" लागू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत नागरिकांकडून कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकरणे दाखल करण्यात आली होती.
सदर योजनेअंतर्गत विहित मुदतीत अर्ज दाखल केलेल्या परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे, काही प्रकरणांमध्ये कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने किंवा चलनाची रक्कम शासन जमा करू न शकलेल्या पक्षकारांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ३१ ऑगस्टरोजीच्या शासन निर्णयाद्वारे उल्हासनगर शहरातील प्रलंबित प्रकरणांसाठी विशेष बाब म्हणून १ महिन्याचा अतिरिक्त कालावधी मंजर केला आहे.
निर्णयाची प्रमुख वैशिष्ट्ये व नियम : अतिरिक्त कालावधी : उल्हासनगर शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी, ठाणे (ग्रामीण) यांच्या कार्यालयात 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३' अंतर्गत विहित कालावधीत दाखल झालेली व या शासन निर्णयाच्या दिनांकास प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी, तसेच संबंधित पात्र पक्षकारांना देय मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विशेष बाब म्हणून ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.
पात्रता : या अतिरिक्त कालावधीचा लाभ केवळ अशाच पक्षकारांना मिळेल, ज्यांनी अभय योजना-२०२३ अंतर्गत विहित कालावधीत अर्ज दाखल केला आहे आणि ज्यांचे प्रकरण शासन निर्णयाच्या दिनांकास मुद्रांक जिल्हाधिकारी, ठाणे (ग्रामीण) यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. नवीन अर्जांना लागू नाही : हा ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी नवीन अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध राहणार नाही. या शासन निर्णयाच्या दिनांकानंतर नव्याने दाखल होणाऱ्या कोणत्याही प्रकरणास याचा लाभ मिळणार नाही.
विशेष बाब : या शासन निर्णयातील तरतुदीमुळे कोणत्याही व्यक्तीस भविष्यात अशाच प्रकारची मुदतवाढ अथवा सवलत मागण्याचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. हा निर्णय केवळ विशेष बाब म्हणून घेण्यात आला असून, यामुळे भविष्यातील कोणत्याही प्रकरणासाठी किंवा राज्यातील इतर कोणत्याही क्षेत्रासाठी कोणताही पूर्वदृष्टांत (Precedent) निर्माण होणार नाही.
संपर्क व अधिक माहितीसाठी पत्ता : उल्हासनगर शहरातील पक्षकारांसाठी : सह दुय्यम निबंधक उल्हासनगर क्र. 1, कॅम्प नं. ५ उल्हासनगर इतर माहितीसाठी कार्यालयाचा पत्ता : सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, ठाणे (ग्रामीण), पहिला मजला, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वर, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे (पश्चिम), ४००६०१. संपर्क साधावा.
शुल्क कागदपत्रे सादर करणे शुल्क व कागदपत्रे सादर करणे : उपरोक्त कालावधीत संबंधित पात्र पक्षकारांनी अभय योजनेनुसार देय असलेले मुद्रांक शुल्क व दंड विहित पद्धतीने शासन जमा करावा तसेच प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व माहिती सादर करावी.
मर्यादित क्षेत्र : मुदतवाढीचा हा लाभ केवळ उल्हासनगर शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी, ठाणे (ग्रामीण) यांच्या कार्यालयात प्रलंबित असलेल्या पात्र प्रकरणांपुरताच मर्यादित राहील. राज्यातील इतर कोणत्याही कार्यालयातील प्रकरणास हा लाभ अनुज्ञेय असणार नाही.