डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : दीनदयाळ रस्त्यावर असणाऱ्या शिवसेना शाखा प्रमुख परेश म्हात्रे आणि नव निर्वाचित शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर परेश म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात जाऊन विवेक खामकर यांनी शाखेतले महत्त्वाचे कागदपत्र आणि १५ हजारांची चोरी केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी शहर प्रमुख विवेक खामकर आणि विभाग प्रमुख श्याम चौगुले यांना शुक्रवारी रात्री अटक केली. तर शनिवारी कल्याण न्यायालयाने या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आज रविवारी न्यायलयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. काही शिवसैनिकांनी शिंदे गट तर काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही शिवसेना पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले असून नवीन शिवसैनिकांना पदाची जबाबदारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी विवेक खामकर यांना शहरप्रमुख असे पद दिले. मात्र, दोन दिवसातच खामकर आणि त्यांचे इतर सहकारी हे डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाळ येथील शाखेत सभासद नोंदणी फॉर्म संदर्भातील कामानिमित्त गेले. मात्र, शाखेच्या दारावरच लावलेल्या जुन्या बॅनरवरून शाखेत बसलेल्या शाखाप्रमुख परेश म्हात्रे आणि पवन म्हात्रे यांना तुम्ही नेमके कोणत्या गटात आहात, ते आधी स्पष्ट करा, असा जाब विचारला.
त्यानंतर तुम्ही शिंदे यांचे फोटो असलेले जुने बॅनर अजूनही काढले नाहीत, असे विचारत शिवीगाळ केली. तसेच काही महत्त्वाचे पेपर आणि १५ हजार रुपये घेऊन निघून गेले, अशी तक्रार शाखा प्रमुख परेश म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार पोलिसांनी शहर प्रमुख विवेक खामकर, विभाग प्रमुख श्याम चौगुले यांना अटक केली होती. शनिवारी कल्याण न्यायालयाने एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली. मात्र, रविवारी न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचलंत का ?