

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काही जणांना मातोश्रीने जरा जास्तच प्रेम दिलं होत आणि त्या प्रेमाचे काटे टोचायला लागले म्हणून आता पलिकडे गेले, असा टाेला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखाेर नेत्यांना लगावला. मातोश्रीवर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसमोर ते बाेलत हाेते.
यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, काही जणांना मातोश्रीने जरा जास्तच प्रेम दिलं होत आणि त्या प्रेमाचे काटे टोचायला लागले म्हणून आता पलिकडे गेले. बर गेले ते गेले मातोश्रीहून दिल्लीला पळतात. काल सुध्दा कसे पळालेत ते पहायला मिळाले. अडीच वर्षात असे कधीही झाल नव्हतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिमाखाने शानदारपणे राज्य करण्याचा प्रयत्न केला. कोणतही दडपण माझ्यावरती नव्हतं, कुणीही बेल वाजवल्यानंतर जर जेवत असलो तर जेवण अर्धवट टाकून पळत यायचो, आता मात्र, पुन्हा एकदा काही काळापुरती का होईना हीच परिस्थिती महाराष्ट्रावरती ओढावली आहे.
.राज्यपाल म्हणजे, हे पद फार मोठ आहे. त्या पदाचा मान जसा आपण राखतो तसा त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने तो राखण्याची गरज आहे. पण कालपासून जी एक सुरुवात झालेली आहे त्याचाच आजचा हा दुसरा टप्पा तो म्हणजे, आता आपण इकडे एकमेकांशी बोलतांना संजय राऊतांच्या घरी ईडीचे पाहुणे बसले आहेत. हे काय चाललेलं आहे? हे काय कारस्थान आहे? हे कारस्थान एवढं भयानक आहे काल ते कोश्यारी बोलले महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान त्यांनी केला, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना एकदा का नातं तुटलं, तुटू शकत नाही. त्यांच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी ते तुटू शकत नाही. तुटणारच नाही पण त्यांच्या प्रयत्नच तसा आहे की शिवसेना आणि ठाकरे नातं एकदा तोडलं की ती जी राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची. झाला प्रयत्न करुन झाला. आज सुध्दा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखठोक लिहिलेले आहे. त्याच्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. पण हे सगळ कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चाललेलं आहे की लाज लज्जा सोडून हे कारस्थान चाललेले आहे. एक दमनशाही, दडपशाही सुरु आहे, असा आराेपही त्यांनी केला.
शिवसैनिक आजही ताठ पाठकण्याणे उभा आहे आणि मरे पर्यंत राहणार. आणि म्हणून मला वाटतय मी वारंवार सांगतोय की एका नव्या पर्वाला सुरुवात होतेय, जर या देशा मध्ये लोकशाहीचा खून होणार असेल हत्या होणार असेल, जे सरन्यायाधीश बोलले विरोधी पक्षाला दुश्मन समजू नका, आता विरोधी पक्ष तर लांबच आहे पण एकाकाळी मित्र पक्षच होता त्याचा सुध्दा गळा घोटण्याचे काम सुरु आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या मातीच शौर्य आहे असे कितीतरी आले. त्या मातीला स्मरून एकच सांगेल की शेवटच्या क्षणा पर्यंत या जुलूमशाही विरोधात लढत राहू महाराष्ट्राची माती काय असते त्यांचा पराक्रम काय असतो गरज पडली असेल तर आपल्या वरती अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ. असा इशाराही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचलंत का?