

Dombivli Physiotherapy Student Death
डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या डोंबिवली जवळच्या गोळवली गावातील विरा लॉजमध्ये एका २३ वर्षीय फिजिओथेरपीच्या विद्यार्थीनीचा मृतदेह फॅनला गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सदर विद्यार्थीनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी सुमित खवळे (३०, रा. कांजूरमार्ग, मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मानसिक त्रास देण्यासह खासगी फोटो व व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे आपल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
मानसी गावकर (वय २३) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती अंबरनाथ येथील बी. आर. हर्णे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये शिक्षण घेत होती. ८ ऑक्टोबर रोजी ती नेहमीप्रमाणे घरातून कॉलेजला गेली. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही आणि तिचा फोनही लागत नसल्याने कुटुंबीयांनी चिंतेत पडून कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान तपासात मानसी ही गोळवलीतील विरा लॉजमध्ये १०६ क्रमांकाच्या रूममध्ये उतरल्याची माहिती समोर आली. ९ ऑक्टोबर रोजी रूममधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने लॉजचे कर्मचारी आणि पोलिसांनी दरवाजा उघडला असता मानसी मृतावस्थेत आढळून आली. घटनास्थळी पोलिसांना एक नोट सापडली.
मानसीच्या वडिलांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी सुमित हा विवाहित असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. असे असताना देखील त्याने मानसी हिच्यासोबत मैत्रीचे नाटक करून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. कालांतराने आरोपी सुमित हा विवाहित असल्याचे समजल्यानंतर मानसीने त्याच्याशी बोलणे बंद केले. तरीही तो इन्स्टाग्रामसह अन्य माध्यमांतून तिच्याशी सतत संपर्क साधत होता. तसेच तिचे काही खासगी फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला प्रचंड मानसिक त्रास देत असल्याचे मानसीने आपल्या बहिणीला सांगितले होते, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.
आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी
आपल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचे वडिलांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आरोपी सुमितच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे, या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी सुमित खवळे याला अटक केली असून गुरूवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ बनसोडे करत आहेत.