

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या स. वा. जोशी शाळेसमोरील रेल्वेच्या उड्डाण पुलावर एका तरुणाने चक्क पुलावर लटकून धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित तरुण नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तो पुलाच्या कठड्यावर लटकून आरडाओरड करत गोंधळ घालत होता. हा जीवघेणा थरार पाहून नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान असलेल्या या पुलावर तरुण अशा धोकादायक अवस्थेत लटकत असल्याचे पाहताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. कुणीतरी खाली पडेल की काय या भीतीने उपस्थितांच्या मनात धडकी भरली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काही धाडसी तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेत जीवाची बाजी लावत लटकलेल्या तरुणाला पकडले आणि सुरक्षितपणे पुलाच्या बाजूला ओढून आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि संभाव्य दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या तरुणाच्या अशा बेजबाबदार कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. हा तरुण कोण होता? पुलावर कशासाठी स्टंटबाजी करत होता? असे करण्यामागे त्याचा उद्देश काय होता? आदी प्रश्नांची उत्तरे मात्र अनुत्तरीत राहिली आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन अधिक चौकशी करावी, अशी मागणी डोंबिलीकरांमधून होत आहे.