

डोंबिवली : डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या पुढाकारातून गुरुवारी हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत पहाटेपासून राष्ट्रभक्तीचा जागर दिसून आला. यात्रेत सहभागी झालेल्या डोंबिवलीकरांमध्ये राष्ट्रभक्तीचे चैतन्य फुलले होते. गणेश मंदिरात गणेशाचे पूजन झाल्यानंंतर पश्चिम डोंबिवलीतील भागशाळा तथा कान्होजी जेधे मैदान येथून पालखीसह स्वागत यात्रेला प्रारंभ झाला.
डोंबिवलीचे पाहिले नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी श्रीगणेश मंदिर संस्थानचे अध्यक्षस्थानी असताना त्यांच्या काळात सुरू झालेली डोंबिवली गुढीपाडव्यादिनी निघणारी स्वागत अर्थात शोभायात्रा सातासमुद्रापार पोहोचली आहे. डोंबिवली स्वागतयात्रेचा आदर्श ठेवत देश-विदेशात स्वागत यात्रा काढली जाते. डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रा हा गुढीपाडव्यानिमित्त होणारा एक भव्य सांस्कृतिक सोहळा मानला जातो.
यंदा 28व्या वर्षात प्रवेश करणारी ही यात्रा भागशाळा मैदान ते फडके रोड दरम्यान पार पडली. 111 हून अधिक संस्थांचा सहभाग, ढोल-ताशा, चित्ररथ आणि पारंपरिक वेशभूषेतील हजारो नागरिक सहभागी होऊन वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्षासह सांस्कृतिक वारसा या यात्रेच्या माध्यमातून जपला गेला. 1999 मध्ये सुरू झालेली ही स्वागतयात्रा महाराष्ट्रातील अशा यात्रांची जननी मानली जाते. यंदा वंदे मातरम् गीताचे हे 150वे वर्ष असल्याने श्री गणेश मंदिर संस्थानच्या संजोजन समितीने राष्ट्रभक्ती ही संकल्पना घेऊन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्याचे नियोजन केले होते.
यावेळी प्रथमच हे नियोजन 20 ते 30 वयोगटातील तरुणांकडे देण्यात आले होते. पहाटे चार वाजल्यापासून बापूसाहेब फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिरात स्वागत यात्रेची लगबग सुरू होती. पहाटे गणेश पूजन झाल्यानंतर पालखी पश्चिमेकडील कान्होजी जेधे मैदानात नेण्यात आली. पालखीचे विधीवत पूजन केल्यानंतर स्वागत यात्रेला सकाळी प्रारंभ झाला. स्वागत यात्रेमध्ये बालगोपाळ, ज्येष्ठ, वृद्ध, महिला, पुरुष आणि तरुण मंडळी विविध प्रकारचे पेहराव करून उत्साहाने सहभागी झाले होते.
स्वागत यात्रेत डोंबिवलीतील वेगवेगळ्या स्तरात कार्य करणाऱ्या 111 संस्थांनी सहभाग घेतला. राष्ट्रभक्तीचा संदेश आणि देशभक्ती जागृत करणारे चित्ररथ रस्त्यांच्या दुतर्फा थांबलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. देशभक्तीपर गीते स्वागत यात्रेतील सहभागींकडून गायली जात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चित्ररथावर संघ परंपरा चितारण्यात आली होती. पोलिसांकडून सामाजिक सुरक्षेचे संदेश दिले जात होते. चित्ररथांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्थांनी समाजात वाढत असलेले अन्याय अत्याचार याविषयी समाजाने घ्यायची काळजी आणि समाज संघटन याविषयीची जनजागृती केली.
वाढत्या उष्णतामानावर वृक्ष लागवड, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जंगल आणि झाडांचे संगोपन करण्यासाठी समुहाने, तसेच व्यक्तिगत पातळीवर पुढाकार घेण्याचे पर्यावरणप्रेमी संस्थांनी आवाहन केले. विशेष म्हणजे जलसंवर्धनासंदर्भात देखील जनजागृती करण्यात आली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करणारा चित्ररथ शहर विकासाचा भविष्यवेधी आराखडा दाखवत होता. यापुढील काळात आपल्या शहरात मेट्रो, दुमजली मार्गिका, सर्वोपचारी रुग्णालये कशी सुरू होत आहेत, याचे आराखडे चित्ररथावर मांडण्यात आले होते.
सायकल/बाईक रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
बापूसाहेब फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष दिसत होता. मित्र/मैत्रिणी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत होत्या. यातील नवी वाहने खरेदी केलेल्या अनेकांची सेल्फीसाठी लगबग सुरू होती. तर गणेश मंदिरात पहाटेपासून डोंबिवली शहर परिसरातील भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. यात्रेच्या सुरुवातीला फेटा, नाकात नथ, नऊवारी साडी नेसून महिलांनी बुलेट आणि बाईकची रॅली कढली होती. तर सायकल प्रेमी संघटनांचे सायकलस्वारही यात्रेत सहभागी झाले होते.
ऐन समारोपात वीज पुरवठा खंडित
श्री गणेश मंदिराच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार हळबे, आदी नेते मंडळी आपल्या पदाधिकारी आणि चाहत्यांसमवेत स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र हास्य जत्रेचे कलाकार दत्तू मोरे, चेतना भट, विराट जगताप, आदी यात्रेत सहभागी झाले होते. स्वागत यात्रा समाप्तीच्या वेळेतच मंदिर परिसरातील असलेल्या महावितरणच्या विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाला. त्यामुळे वीज पुरवठा काही वेळ खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून वीजपुरवठा पूर्ववत केला.
रांगोळ्यांच्या पायघड्यांसह स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी
सालाबादप्रमाणे यंदाही संस्कार भारतीचे उमेश पांचाळ यांनी फडके रोडसह अनेक ठिकाणी असलेल्या चौकांत रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानपाडा रोडसह पश्चिम स्टेशन परिसर डोंबिवली शहर शाखा आणि महिला आघाडीच्या शिकडो शिवसैनिकांनी स्वागत यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर पुष्पवृष्टी केली. यात्रेत चालणाऱ्या सहभागींना अनेक ठिकाणी पाणी, सरबत आणि खाऊचे वाटप करण्यात येत होते. तर अनेक ठिकाणी शोभ यात्रा ज्या वाटेवरून जात होती, त्या ठिकाणी पुष्पवृष्टी देखील सुरू होती.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट
आप्पा दातार चौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरवर आधारित आगळावेगळा कार्यक्रम शाळकरी मुलांनी सादर केला. या सादरीकरणाला उपस्थित मान्यवर आणि डोंबिवलीकरांनी टाळ्यांचा कडकडाटाने दाद दिली. वंदे मातरम्च्या 150 व्या वर्षाच्या विशेष संकल्पनेवर आधारित सामुदायिक वंदे मातरम् गायन आणि ऑपरेशन सिंदूर या राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांचे उपस्थितांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राष्ट्रभक्ती कार्यक्रमामुळे डोंबिवलीकरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
कल्याणमध्ये निघाली स्वागतयात्रा
कल्याण पश्चिमेकडे कल्याण संस्कृती मंच आणि जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. मुरबाड रोडला असलेल्या सिंडिकेट येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेचा नमस्कार मंडळ येथे समारोप झाला. कल्याणच्या विविध स्तरातील संस्था/संघटनांसह कल्याणकर स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील चौकांत ढोल/झांंज पथके यात्रेचे स्वागत करत होती. कल्याण पूर्व, डोंबिवली ग्रामीण, एमआयडीसीच्या निवासी विभागात स्थानिकांनी काढलेल्या स्वागत यात्रा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.
नववर्ष स्वागतयात्रेचा आरंभ आणि समारोप
पश्चिम डोंबिवलीतील कान्होजी जेधे मैदान येथून सुरू झालेली स्वागत यात्रा गोपी चौक, सम्राट चौकमार्गे पंडित दिनदयाळ रोडने कोपर उड्डाण पूल ओलांडून टंडन रोड, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौकातून बापूसाहेब फडके रोडने मदन ठाकरे चौकात समाप्त झाली. यात्रेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पेहराव करून आपल्या आई/वडिलांसमवेत सहभाग घेतला होता.
अनेक श्वान हौशींनी आपल्या लाडक्या श्वानांना रंगीबेरंगी पेहरावात स्वागत यात्रेत सहभागी केलेले पाहावयास मिळाले. स्वागत यात्रेच्या मार्गावर विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी केली. विशेष म्हणजे मुस्लीम समाज संघटनेने देखील पुष्पवृष्टी करून स्वागत यात्रेत सहभाग घेतला होता. यात्रेतील सहभागींसाठी विविध नाक्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.