Hapus mango sales Mumbai : गुढीपाडव्याला मुंबईकरांनी फस्त केले 32 कोटींचेे हापूस
नवी मुंबई : हापूसने मुंबईकरांचा गुढीपाडव्याचा गोडवा चांगलाच वाढवला. सुमारे 32 कोटींच्या हापूसची गेल्या आठवडाभरात एपीएमसीच्या फळबाजारातून मुंबईशह, ठाणे, नवी मुंबईत विक्री झाली आहे. अंदाजे 90 हजार डझन हापूस मुंबईकरांनी गुढीपाडव्याला फस्त केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गुरुवारी कोकण हापूसची 13,925 पेट्यांची आवक फळ बाजारात झाली. तर गेल्या दहा दिवसांत एपीएमसीतून 90 हजार डझन कच्च्या हापूसची विक्री झाली होती. तोच पिकलेला हापूस आंबा गुरुवारी बाजारात अडीच हजार रुपये डझन दराने विक्री केला असून यातून22 कोटी 50 लाख रुपयांची उलाढाल झाली. तर परराज्यातील हापूसची 10 कोटींची अशी एकूण 32 कोटी 50 लाख रुपयांचे हापूस मुंबईकरांनी आज गुढीपाडव्याला फस्त केले, अशी माहिती घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक तब्बल 40 हजार पेट्यांनी यंदा घटली आहे.
आज गुढीपाडव्याला फळबाजारात कोकण हापूसच्या 13 हजार 925 पेट्यांची तर परराज्यातील 10 हजार 875 क्रेट मिळून एकूण 24 हजार 800 पेट्या दाखल झाल्या होत्या. हापूसचे दर 5 ते 9 डझनाच्या पेटीचे 2 ते 8 हजार रुपये असल्याचे घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. गेल्या 15 दिवसांत कोकण हापूसच्या केवळ 26 हजार 273 पेट्यांची तर परराज्यातील हापूसचे 1 लाख 7 हजार 712 क्रेडची आवक झाली होती.
त्यापैकी मागील दहा दिवसांत कोकणातून झालेल्या आवकचे 90,000 डझन कच्चे आंबे किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापाऱ्यांनी पिकवले आणि मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवारी गुढीपडव्याला तयार माल विकला. मुंबईसह उपनगरात तीन दिवसांत तब्बल 22 कोटी 50 लाख रुपयांचा कोकण हापूस विकला गेला. तर 10 कोटी रुपयांचा परराज्यातील कर्नाटक हापूसची विक्री करण्यात आली.
एपीएमसीत बाळासाहेब बेंडे या घाऊक व्यापाऱ्याने स्वतःचा देव नावाचा ब्रेंड तयार केला असून त्यांच्याकडून बडे व्यावसायिक, राजकीय नेते, व्यापारी हापूस खरेदी करतात. तर मोहन डोंगरे हे निर्यातदार असून तेही कोकण हापूस पिकवून ऑर्डरनुसार हापूसची विक्री करतात.
एपीएमसीत असे 20 ते 25 व्यापारी आहेत, जे तयार माल विक्री करतात. तीन दिवस आधीच काही व्यापाऱ्यांनी माल तयार करुन ऑर्डरनुसार मॉल, बडे व्यापारी यांना पाठवला.
साधारणत: 20 एप्रिलपर्यंत देवगड, राजापूर हापूसची आवक होईल. त्यानंतर 15 एप्रिलपासून रत्नागिरी गावदरीतील आंबा विक्रीसाठी बाजारात येईल. 20 एप्रिलपासून श्रीवर्धन, बागमांडला, मुरुड, अलिबाग, दापोली, बाणकोटच्या आंब्यांची आवक सुरू होईल.
गुढीपाडव्याला अडीच हजार रुपये डझन दराने मुंबईसह उपनगरात हापूस विकला आहे. कच्चा हापूसपेक्षा 30 ते 40 टक्के आधिक दर फिकवलेल्या हापूसच्या पेटीचे होते. तर एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडे तयार हापूस नसल्याने अनेक ग्राहकांना परत जावे लागले.

