पुढारी ऑनलाईन डेस्क : डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील अमुदान या थिनर बनविणार्या केमिकल कंपनीच्या बॉयलरचे (गुरूवार) दुपारी पावणेदोनच्या सुमारास लागोपाठ चार-पाच स्फोट (Dombivli MIDC Blast) झाले. या स्फोटातील मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. तर ६० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, बॉयलरच्या स्फोट प्रकरणी अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह कंपनीचे संचालक, प्रशासक आणि इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम ३०४, ३२४, ३२६, २८५, २८६, ४२७ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
मेहता कुटुंबीय आणि अमुदान कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी फरार झाला आहे. संशयिताला पकडण्यासाठी एकूण ५ पथके तयार करण्यात आली असून ते त्याचा शोध घेत आहेत, असेही पोलिसांनी म्हटले आहे. रासायनिक प्रक्रिया आणि कच्चा माल आणि उत्पादनांच्या साठवणुकीबाबत योग्य ती खबरदारी घेतली गेली नसल्याने रासायनाचा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या परिसराच्या बाजूलाच एक पेंट कंपनी असून तिथे अजूनही थोडी आग लागलेली आहे. कूलिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आज (शुक्रवार) सकाळी आणखी 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी दत्तात्रय शेळके यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा ११ वर गेला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले आहेत. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमधील अतिधोकायदक असलेल्या रासायनिक कंपन्या डोंबिवलीबाहेर हलविण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
हे ही वाचा :