डोंबिवलीच्या रसायन कारखाना स्फोटातील मृतांचा आकडा ११ वर, ६० जण जखमी | पुढारी

डोंबिवलीच्या रसायन कारखाना स्फोटातील मृतांचा आकडा ११ वर, ६० जण जखमी

डोंबिवली/ठाणे; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील अमुदान या थिनर बनविणार्‍या केमिकल कंपनीच्या बॉयलरचे (गुरूवार) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास लागोपाठ चार-पाच स्फोट झाले. या शक्तिशाली स्फोटात संपूर्ण कारखाना बेचिराख झाला असून शेजारील ह्युंदाई कंपनीची शोरूमही जळून खाक झाली. या स्फोटात ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ६० जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून युद्धपातळीवर स्फोटामागील कारणे शोधली जात आहेत.

या परिसराच्या बाजूलाच एक पेंट कंपनी आहे. तिथे अजूनही थोडी आग लागलेली आहे. कूलिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आज (शुक्रवार) सकाळी आणखी 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्‍याची माहिती कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्‍निशमन अधिकारी दत्‍तात्रय शेळके यांनी दिली आहे.

शेजारील मे. मेट्रोपोलिटन कंपनी, मे. के. जी. कंपनी, मे. अंबर कंपनी आदी कंपन्यांनाही आग लागली आहे. एका मागोमाग एक कानठळ्या बसवणार्‍या स्फोटांमुळे आसपासचा तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला असून त्या परिसरातील रहिवासी इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने रहिवासी भयभीत होऊन घराबाहेर पडले.

या दुर्घटनेमुळे ८ वर्षांपूर्वी याच महिन्यात आणि याच परिसरातील १२ कामगार मृत्युमुखी पडलेल्या प्रोबेस कंपनीच्या शक्तिशाली स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले असून दुर्घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमधील अतिधोकायदक असलेल्या रासायनिक कंपन्या डोंबिवलीबाहेर हलविण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार केला.

हेही वाचा : 

Back to top button