ठाणे : पुढारी वृत्तसेवा डोंबिवलीतील एमआयडीसी येथील अमूदान कंपनीत रिअॅक्टरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याच्या दुर्घटनेला सर्वस्वी सदर कंपनीचे मॅनेजमेंट जबाबदार आहे. औद्योगिक विभाग कंपन्यांचे ऑडिट करत नसल्यामुळे व त्यांच्या हलगर्जीपणा व अक्षम्य दुर्लक्षपणामुळे वारंवार अपघाताच्या अशा घटना घडतात, असा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
डोंबिवली येथे अमूदान कंपनीत रिॲक्टरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची मोठी दुर्घटना (गुरुवारी घडली. त्या दुर्घटनास्थळी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. अधिकारी वर्गाकडून याबाबत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अकुशल कामगार व जुने रिअँक्टर वापरामुळे अशा घटना वारंवार घडतात, त्यामुळे बॉयलर प्रमाणे रिअँक्टरवर धोरण आणावे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. याबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची अंबादास दानवे यांनी एम्स रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. महाविकासआघाडी सरकारच्या कार्यकाळात या भागातील पाच विषारी रसायनाच्या कंपन्या शहराबाहेर स्थलांतरीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतर आलेल्या युती सरकारने याबाबत कोणतेच पावले उचलली नाहीत. या युती सरकारने अशा अवैधपणे कंपन्या चालविण्यासाठी संरक्षण दिल्याची टीका दानवे यांनी केली.
या दुर्घटनेला कंपनी मालकासह औद्योगिक विभाग (डिश विभाग), प्रदूषण नियंत्रण मंडळ व उद्योग विभागही जबाबदार असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत. तसेच या कंपनीच्या ऑडिटकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपजिल्हा प्रमुख तात्या माने, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर, युवासेना अधिकारी प्रतीक पाटील, प्रमोद कांबळी उपस्थित होते.
हेही वाचा :