

ठाणे : कासारवडवलीचा नवीन उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर डी मार्ट ते कासारवडवली नाक्यापर्यंत होणारी वाहतूक कोंडी कमी झाली असली तरी हा उड्डाणपूल उतरल्यानंतर गायमुख घाटात मात्र वाहतूक कोंडी वाढली आहे. गायमुख हा घाट हा अरुंद असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे तासन्तास या घाटात वाहनांच्या रांगा लागत असून यापूर्वी कासारवडवलीच्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका झाली असली तरी, गायमुख घाटात होणार्या वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना रोजच करावा लागत आहे.
घोडबंदर महामार्गावर मेट्रो -4 चे काम सुरू असून या महामार्गावरील दोन्ही बाजूचे सेवा रस्ते महामार्गात विलीन करण्याचे काम देखील मेट्रोच्या कामासोबतच सुरू आहे. याशिवाय रस्ते दुरुस्तीची कामे देखील हाती घेण्यात आली आहेत. एकाच वेळी सर्वप्रकारची कामे हाती घेण्यात आली असल्याने घोडबंदर महामार्गावर रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. कापूरबावडी आणि मानपाडा हे वाहतूक कोंडीचे जंक्शन गेल्यानंतर डी मार्टपासून सुरू होणारी वाहतूक कोंडी थेट गायमुखपर्यंत होत होती. त्यामुळे आनंदनगर आणि कासारवडवलीला जाणार्या वाहन चालकांना रोजच वाहतूक कोंडीचा त्रास होत होता.
ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने मेट्रोच्या लाईन खाली उड्डाणपूल बांधण्यात आला असून हा उड्डाणपूल नुकताच वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता ज्यांना कासारवडवलीला जायचे नाही ती वाहने थेट उड्डाणपुलावरून जात असल्याने खालची कासारवडवलीची वाहतूक कोंडी कमी झाली असली तरी ही सर्व वाहने उड्डाणपुलावर उतरून गायमुख घाटापर्यंत गेल्यावर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
या घाटाची दुरुस्ती यापूर्वी अनेकवेळा करूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून घाट अरुंद असल्याने वाहने देखील हळूहळू जातात. त्यामुळे कासारवडवलीची कोंडी सुटली मात्र गायमुखची कोंडी वाढली अशी म्हणण्याची वेळ वाहन चालकांवर आली आहे.