

उल्हासनगर : उल्हासनगर पॅनल 12 मधील वडोल गांवात गेल्या चार महिन्यापासुन पाणी समस्या निर्माण झाली असुन नवीन पाईप लाईन टाकुन सुध्दा पाणी येत नाही. त्यामुळे या चार दिवसात पाणी समस्या सुटली नाही तर वडोल गावचे नागरिक व महिलांच्या वतीने महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी नगरसेविका सविता तोरणे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आयुक्ताना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल 12 मधील वडोल गांवात गेल्या चार महिन्यापासुन पाणी येत नाही. काही नागरिकांनी गढूळ पाणी येत असल्याची तक्रार केली होती. पालिकेने तपासणी न करता रस्ता खोदून नवीन पाईप लाईन टाकली. समस्या न सुटता उलट ही समस्या अत्यंत गंभीर बनली आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नवीन पाईप लाईन टाकली असुन चारी बाजुनी नविन रस्ते खोदुन ठेवले आहेत. त्यामुळे येथील नागरिकाना चालने सुध्दा कठीण झाले आहे.
नवीन पाईप लाईन टाकन्यापुर्वी पाणी येत होते. मात्र काही ठिकाणी गढूळ होते. आता तर काही ठिकाणी अजिबात पाणी येत नसल्याने नागरिकांसह महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दरम्यान येत्या चार दिवसात वडोल गावची पाणी समस्या सुटली नाही, तर वडोलगाव ग्रामस्थ व महिलांचा हंडा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेविका सविता रगडे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी निवेदनात दिला आहे.