

डोंबिवली : अभिजित थरवळ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या प्रवेशास तूर्तास स्थगिती देण्यात येत आहे, अशी पोस्ट डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी फेसबुकवर केली आहे. या पोस्टनंतर डोंबिवली पूर्वेकडील जिजाईनगर परिसरात बॅनर लागला आहे. या बॅनरवर विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती... असा आशय नमूद करण्यात आला आहे. अभिजित थरवळ यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर लागलेला हा बॅनर साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या आठवड्यात मोठ्या जल्लोषात शिवसेना शिंदे गटाचे युवा गटाचे कार्यकर्ते अभिजीत थरवळ यांचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश झाला होता. मात्र या प्रवेशाला रविंद्र चव्हाण यांच्याकडून शिवसेनेचे अभिजीत थरवळ यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
डोंबिवलीत शनिवारी एका व्यासपीठावर शेजारी बसून हितगुज केल्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यातील चर्चेचे दृश्य परिणाम चोविस तासाच्या आत दिसू लागले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या शायरीतून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना चिमटा घेऊनही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी खासदार डॉ. शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते. या सर्व परिस्थितीतचे दृश्य परिणाम म्हणून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ यांचे चिरंजीव अभिजीत थरवळ यांच्या भाजपातील प्रवेशाला स्थगिती दिल्याचे आपल्या समाज माध्यमांतील ऑनलाईन संदेशातून रविवारी जाहीर केले.
प्रदेशाध्यक्षांकडून टीकेला पूर्णविराम
गेल्या आठवड्यात मोठ्या जल्लोषात शिवसेना शिंदे गटाचे युवा गटाचे कार्यकर्ते अभिजीत थरवळ यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश झाला होता. एकीकडे या प्रवेशामुळे वडील शिवसेनेत आणि मुलगा भाजपामध्ये असे चित्र निर्माण झाले होते. तर दुसरीकडे युती धर्माचे पालन करण्याऐवजी भाजपाने शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते माजी लोकप्रतिनिधींना पक्षात घेतल्यानंतर शिंदे शिवसेनेकडून भाजपावर टीकेची झोड उठवली जात होती. परिणामी या प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अभिजीत थरवळ यांच्या भाजपातील प्रवेशाला स्थगिती देऊन या टीकेला पूर्णविराम दिला आहे.
दोन्ही बाजूंनी फोडाफोडी
गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटासह इतर पक्षातील इच्छुक पदाधिकारी, नगरसेवकांना भाजपामध्ये प्रवेश देण्याचा सपाटा लावला होता. कल्याण-डोंबिवली हा तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणीही शिवसेना शिंदे गटातील शिवसेनेचे मुख्य म्होरके भाजपाने आपल्या पक्षात ओढून शिवसेनेला धक्का दिला होता. शिवसेनेने उल्हासनगर, अंबरनाथमध्ये भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकारी पहिले आपल्या पक्षात दाखल करून घेतले. फोडाफोडीला शिवसेना शिंदे गटाने सुरूवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने ही फोडाफोडीची मोहीम सुरू केली होती.