

बेळगाव : सत्ताधारी-विरोधक येणार आमने-सामने
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर बेळगाववरील ताबा सुटेल, या भीतीतून 2006 पासून कर्नाटकाने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात घेण्याचा घाट घातला आहे. सोमवारी (दि. 8) बेळगावातील चौदाव्या अधिवेशनाला सुरवात होणार आहे, तर सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही बेळगावात घेण्यात येणार्या बेकायदा अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने दरवेळेप्रमाणे महामेळाव्याची हाक दिली आहे.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार असून, यातून कर्नाटकाच्या बेकायदेशीर कृत्याचा निषेध करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिवेशन विरुद्ध महामेळावा असे चित्र निर्माण झाले असून, यामध्ये पोलिसांची मात्र चांगलीच कसरत होणार आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, अविश्वास प्रस्तावाची तयारी या महत्त्वाच्या घडामोडींसह ऊस उत्पादक, वेगळा उत्तर कर्नाटक, जिल्हा विभाजन आणि पंचमसाली समाजाचे आरक्षण या विषयांवरून गोंधळाचे वातावरण असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि. 8) सुरू होणार आहे. 19 डिसेंबरपर्यंत चालणार्या या अधिवेशनात अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे.
दहा दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेळगाव पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अधिवेशनासाठी येणारे मंत्री आणि आमदारांसाठी सर्व तयारी आधीच केली आहे. संपूर्ण राज्याची प्रशासकीय यंत्रणा अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राबत आहे. सुवर्णसौधमधील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध विभागांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयांच्या स्वच्छतेची तपासणी अधिकार्यांचे एक पथक नियमितपणे करत आहे. फर्निचर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दिवे, एसी यांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दुसरीकडे सुरक्षेसाठी इमारतीच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. इमारतीत कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पान 4 वरआवारात मोबाईल टॉवर, अधिकार्यांसाठी जेवण आणि मिनीबसची सोय करण्यात आली आहे.
निवासासाठी 2,276 खोल्या बुक
अधिवेशनासाठी आलेले मंत्री, आमदार, अधिकार्यांच्या निवासासाठी 2,276 खोल्या आरक्षित केल्या आहेत. 85 हॉटेल व लॉजमध्ये या अधिकार्यांच्या निवासासाठी सोय करण्यात आली आहे. सहा हजार पोलिस कर्मचार्यांसाठी जर्मन तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सुवर्णसौधभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुवर्णसौधभोवती पोलिसांचे कडे
हिवाळी अधिवेशनाच्या पृष्ठभूमीवर सुवर्ण सौधभोवती 20 दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू केला आहे. दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे पोलिसांनी सतर्कतेसाठी सुवर्णसौधभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून कडक बंदोबस्त ठेवला आहे. 2012 ते 2024 या काळात हिवाळी अधिवेशनात अनुचित घटनांचे 27 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 73 पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि 21 लोक जखमी झाले आहेत. 6 लाख 23 हजार रुपयांच्या सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, यावेळी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.
परवानगी असलेल्यांनाच आंदोलनाची मुभा
दहा दिवसांच्या अधिवेशनकाळात पोलिस विभागाची परवानगी आहे, त्यांनाच आंदोलन करता येणार आहे. एकीकडे, बागलकोटमध्ये ऊस आणि मका उत्पादक शेतकर्यांकडून निषेध होत आहे आणि अधिवेशन एकाचवेळी सुरु असल्याने, शेतकरी घेराव घालण्याची शक्यता आहे. या कारणास्तव, सुवर्णसौधभोवती पाचपेक्षा जास्त लोकांच्या गटांना जमण्याची परवानगी नाही. कोणतीही शस्त्रे, प्राणघातक शस्त्रे किंवा काठ्या घेऊन जाण्यास परवानगी नाही. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून निषेध करण्यास परवानगी नाही. विविध 10 अटींसह प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
84 संघटनांचे आंदोलन
यंदा अधिवेशन काळात बस्तवाड, कोंडस्कोप या ठिकाणी आंदोलनांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याठिकाणी यंदा 84 संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. त्यामध्ये भाजपने मंगळवारी (दि. 9) शेतकर्यांच्या समस्यांसाठी सुवर्णसौधला घेराव घालण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर पंचमसाली समाजाने मूक आंदोलन, शेतकर्यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनांमुळे सरकारची चांगलीच कसरत होणार आहे.
21 हून अधिक विधेयके
दहा दिवसांच्या या अधिवेशनात 21 हून अधिक विधेयके मांडली जाणार आहेत. द्वेषपूर्ण भाषण आणि सामाजिक बहिष्कार रोखण्यासाठी नवीन कायदा, अशी दोन महत्त्वाची विधेयके मांडली जातील. सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये खाजगी आउटसोर्सिंग सेवा रद्द करण्यासाठी एक महत्त्वाचे विधेयकही मांडले जाणार आहे. गोवंश हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण (सुधारणा) विधेयक, हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणग्या (सुधारणा) विधेयक आणि घरगुती कामगार सामाजिक सुरक्षा आणि कल्याण (सुधारणा) विधेयक मांडले जाईल.