

डोंबिवली : रात्रीच्या सुमारास बंद दुकाने/घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांना यश आले आहे. या हत्यारबंद चोरट्यांकडून चोऱ्या-घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या दूकलीकडून दुचाकी, टेम्पोसह चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मोहम्मद समी सफी अहमद खान (२५, रा. न्यू टेलीफोन एक्सचेंज, राहुल नगर, मधुबन चौक, सहावी गल्ली, उल्हासनगर - ३) आणि आश्रफ मोहम्मद अख्तर खान (२७, रा. फैजान रजा मस्जिद समोर, इंदिरानगर, बैंगनवाडी रोड, गोवंडी, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बुधवारी रात्रीच्या सुमारास हवालदार निलेश ठिकेकर आणि त्यांचे सहकारी टाटा पॉवर रोडला गस्त घालत होते. पहाटेच्या सुमारास याच रोडला असलेल्या यास्मिन प्लॅस्टर नावाचे दुकान फोडून चोरट्यांनी या दुकानातील ५ लाख ९४ हजार ५०० रूपये किंमतीचा माल एम एच ०५/बी एम/१९९१ क्रमांकाच्या टेम्पोत भरून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. तथापी जीवाची पर्वा न करता या बहाद्दर पोलिसांनी हत्यारबंद चोरट्यांचा कट उधळून लावला.
जप्त केलेल्या टेम्पोची तपासणी केली असता त्यात चोरलेले पिओपीचे साहित्य आढळून आले. या चोरट्यांकडून पिओपीच्या साहित्यासह टेम्पो, कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली स्कूटर, घरफोड्या करण्यासाठी लागणारी हत्यारे हस्तगत केली आहेत.
अटक करण्यात आलेल्या मोहम्मद खान आणि आश्रफ खान या दोघांनी मिळून डोंबिवलीच्या टिळकनगर, कल्याणच्या कोळसेवाडी, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यामाऱ्या केल्याची कबूली दिली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रमेश चौगुले आणि त्यांचे सहकारी हवालदार भूषण पवार करत आहेत.