

AC Local Train Door Issue
डोंबिवली : मंगळवारी सकाळी सकाळी 8.59 ची एसी लोकल डोंबिवली स्थानकात दाखल झाली आणि या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. दरवाजा बाहेर प्रवासी लटकत असल्याने लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. परिणामी ही लोकल डोंबिवली स्थानकात जवळपास 10 मिनिटे रखडली होती. अखेर आरपीएफने पुढाकार घेत काही प्रवाशांना हटवले आणि दरवाजे बंद केल्यानंतर 9.09 मिनिटांनी लोकलचे लोकल मार्गस्थ झाली.
लोकलमधील वाढती गर्दी प्रवाश्यांच्या जीवावर बेतली जात असताना रेल्वे प्रशासन मात्र प्रवाशांवरच जबाबदारी ढकलत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गर्दी कमी करण्यासाठी सामान्य लोकलसह एसी लोकलच्या फेर्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. रेल्वेकडून प्रवासी संख्या कमी झाल्याचे तर कधी कार्यालयाच्या वेळा बदलून गर्दी कमी करण्याचे सल्ले प्रवाशांना दिले जातात. लोकलच्या गर्दीतून धोकादायक प्रवास टाळण्यासाठी रेल्वे प्रवासी आता एसी लोकलला पसंती देत आहेत.
मात्र एसी लोकल दर एक तासाला सोडली जात असल्याने प्रवाशांना साध्या लोकलमधून लटकंती करतच प्रवास करावा लागतो. वाढत्या गर्दीमुळे एसी लोकलचा दरवाजा बंद न होणे, तर कधी दरवाजा उघडत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार केल्या जातात. अनेकदा या लोकल वेळेपेक्षा 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या गर्दीत भर पडते. असाच एक कटू अनुभव प्रवाशांना डोंबिवली रेल्वे स्थानकात आला.