Bhiwandi Food Poisoning : भिवंडीत शोरमाचा विळखा! विषबाधितांचा आकडा ८० वर

दोन बालकांना ठाणे जिल्हा रुग्णालयात हलवले; अतिक्रमण हटवताना तणाव, कारवाईदरम्यान जेसीबीवर दगडफेक
Bhiwandi Food Poisoning
Bhiwandi Food Poisoningpudhari photo
Published on: 
Updated on: 

भिवंडी : संजय भोईर

भिवंडी-वंजारपट्टी नाका परिसरातील ए. के. शोरमा शॉपमधील शोरमा खाल्ल्याने अन्न विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या आता ८० वर पोहोचली आहे. यामध्ये ३९ पुरुष, २५ महिला आणि १६ बालकांचा समावेश आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ११ आणि ५ वर्षांच्या दोन बालकांना पुढील उपचारांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने अखेर आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधित शोरमा दुकानाची कॅबिन जेसीबीने उद्ध्वस्त केली.

ए. के. शोरमा शॉपमधील चिकन शोरमा खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांना उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला रुग्णांची संख्या कमी होती; मात्र काही तासांतच बाधितांची संख्या झपाट्याने वाढत ५६ वर गेली आणि आता ती ८० वर पोहोचली आहे. बाधितांमध्ये एक वर्षाच्या चिमुकल्यासह गर्भवती महिलेचाही समावेश असल्याने चिंतेत भर पडली आहे. सर्व रुग्णांवर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bhiwandi Food Poisoning
Dawood Ibrahim : कच्च्या कानाचा अंडरवर्ल्ड डॉन; धर्मांध प्रवृत्तीने दाऊदचे साम्राज्य संपले...

रुग्णांच्या उलटी, विष्ठा, लघवी आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, दोन बालकांना पुढील उपचारांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी १५ जून रोजी भिवंडीत चिकन शोरमा खाल्ल्याने तब्बल १०७ जणांना अन्न विषबाधा झाली होती. ती घटना ताजी असतानाच पुन्हा ८० जणांना विषबाधा झाल्याने खाद्यपदार्थ विक्रीतील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात शोरमा विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी संबंधित प्रभाग समिती, परवाना विभाग, मार्केट विभाग, अतिक्रमण विभाग, अन्न सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार प्रभाग समिती क्रमांक दोनचे सहाय्यक आयुक्त सईद चिवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शांतीनगर रोडवरील कचेरी पाडा ते के. जी. एन. चौकदरम्यान अतिक्रमित खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या आणि टपऱ्यांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली.

Bhiwandi Food Poisoning
Dombivli MIDC Water Contamination : एमआयडीसीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे रवाना; आरोग्य विभागाची घरोघरी तपासणी

दरम्यान, दिवाळीच्या काळात मंदावलेली अतिक्रमणविरोधी कारवाई पुन्हा तीव्र करण्यात येणार आहे. संध्याकाळच्या वेळी विशेष पथकांमार्फत उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या आणि टपऱ्यांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

  • या कारवाईदरम्यान काही नागरिकांनी पथकाशी हुज्जत घालत विरोध केला. काही समाजकंटकांनी जेसीबीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, फुटेज तपासून दगडफेक करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सईद चिवणे यांनी दिली.

शोरमातून विषबाधा होण्याची संभाव्य कारणे

  1. शोरमातून विषबाधा होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. चिकन व्यवस्थित न शिजल्यास त्यातील साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर यांसारखे घातक जिवाणू जिवंत राहू शकतात. मॅरिनेट केलेले चिकन दीर्घकाळ उघड्यावर किंवा योग्य तापमानाशिवाय ठेवल्यास जिवाणूंची झपाट्याने वाढ होते.

  2. शोरमाच्या रॉडवरील चिकन पूर्ण शिजण्यापूर्वी कापून ठेवणे आणि नंतर पुन्हा वापरणेही विषबाधेला कारणीभूत ठरू शकते. याशिवाय अंड्यापासून बनवलेली मेयोनीज किंवा सॉस योग्य तापमानात न ठेवल्यास ते दूषित होऊ शकतात.

  3. चिकन धुण्यासाठी, सॉस बनवण्यासाठी किंवा भाज्या स्वच्छ करण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर करणे, कच्चे आणि शिजलेले चिकन एकाच चाकूने किंवा फळीवर हाताळल्याने होणारे क्रॉस कंटॅमिनेशन, शिळ्या किंवा व्यवस्थित न धुतलेल्या भाज्यांचा वापर तसेच कर्मचाऱ्यांकडून हातांची, भांड्यांची आणि उपकरणांची स्वच्छता न राखणे, हीदेखील शोरमातून सामूहिक विषबाधा होण्याची संभाव्य कारणे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.