

ठाणे : दिव्यातील गणेश नगर येथे राहणारी 6 वर्षाची चिमुरडी कु. निशा शिंदे हिचे भटक्या श्वानाने लचके तोडून तिला फरफटत नेल्याची दुर्दैवी घटना 17 नोव्हेंबर, 2025 रोजी घडली होती. तब्बल एक महिना मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुरडीचा रविवारी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या मृत्यूने दिव्यात वातावरण संतप्त आहे. तर भटक्या श्वानांचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
17 नोव्हेंबर रोजी गणेश नगरमध्ये घराच्या बाहेर खेळणाऱ्या 6 वर्षीय निशावर भटक्या श्वानाने हल्ला चढविला. एवढेच नव्हे तर श्वानाने तिचे लचके तोडीत चिमुरडीला फरफटत नेले. स्थानिकांनी श्वानांच्या तावडीतून सोडविलेली चिमुरडी गंभीर जखमी झालेली होती.
तिला उपचारासाठी डोंबिवली येथील शास्त्रीनगर मध्ये असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु केले. मात्र गंभीर जखमी झालेल्या चिमुरडी निशा हिने 17 नोव्हेंबरपासून रविवार 21 डिसेंबरपर्यंत मृत्यूशी झुंज दिली. अखेर चिमुरडीची झुंज संपली आणि तिचा मृत्यू झाला.
दिव्यात आणि गणेश नगर परिसरात नागरिकांमध्ये चिमुरडी निशा हिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे वातावरण संतप्त आहे. तर चिमुरडीच्या पालकवर्गाने उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निशाचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.