CDS Anil Chauhan : तंत्रज्ञान, एकात्मता, नवोन्मेषातूनच भविष्यातील युद्धांना उत्तर

आयआयटी मुंबई टेकफेस्टमध्ये संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान यांचे उद्गार
Changing nature of modern warfare
तंत्रज्ञान, एकात्मता, नवोन्मेषातूनच भविष्यातील युद्धांना उत्तरpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत असलेल्या या काळात रणांगण केवळ सीमांपुरते उरलेले नाही. सायबर अवकाश, अंतराळ, माहिती तंत्रज्ञान हे आजच्या संघर्षांचे नवे मैदान बनले आहे. अशा बहुआयामी आव्हानांसमोर भविष्यातील युद्धे जिंकण्यासाठी तंत्रज्ञानातील आघाडी, विविध दलांमधील प्रभावी एकात्मता आणि सातत्यपूर्ण नवोन्मेष हेच निर्णायक घटक ठरणार आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर क्षमता, नेटवर्क-केंद्रित रणनिती आणि स्वदेशी संशोधनाच्या बळावरच राष्ट्राची सुरक्षा मजबूत होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी ही केवळ सशस्त्र दलांपुरती मर्यादित नसून, संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान यांनी केले. आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट 2025 मध्ये भारताची सामरिक संरक्षण दृष्टी, तंत्रज्ञान, एकात्मता आणि भविष्यातील युद्धे या विषयावर बोलताना आपली भूमिका मांडली.

Changing nature of modern warfare
Nitin Gadkari : तरुण बुद्धिमत्तेचा देशाच्या प्रगतीसाठी वापर गरजेचा!

युद्ध हे मानवी संस्कृतीइतकेच जुने असून राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटित हिंसाचाराचा तो एक मार्ग राहिला आहे. मात्र समाज, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान बदलत गेले तसे युद्धाचे स्वरूपही बदलले. शिकारी-संकलक समाजातील लढाया, कृषीयुगातील सरंजामशाही सैन्ये आणि औद्योगिक युगातील आधुनिक राष्ट्र-राज्यांची सशस्त्र दले या प्रवासानंतर आज सार्वभौमत्वालाच आव्हान देणाऱ्या टप्प्यावर जग आले आहे. पैसा, डिजिटल चलन, कल्पना आणि विचारसरणी यांचा सीमापार मुक्त प्रवाह युद्धाची व्याप्ती अधिक गुंतागुंतीची बनवत आहे. असेही त्यांनी नमूद केले.

आजचे युद्ध केवळ सैन्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, सायबर क्षेत्र, सोशल मीडिया, माहिती-युद्ध, भाडोत्री सुरक्षा यंत्रणा आणि प्रभाव टाकणारे डिजिटल घटक हेही संघर्षाचा भाग बनले आहेत. त्यामुळे पारंपरिक जमीन-समुद्र-आकाश या युद्धक्षेत्रांपलीकडे सायबर, अंतराळ, विद्युतचुंबकीय आणि संज्ञानात्मक क्षेत्रे निर्णायक ठरत आहेत. ही क्षेत्रे दैनंदिन जीवनाशी जोडलेली असल्याने ती अधिक संवेदनशील आणि प्रभावी बनली आहेत. पारंपरिक युद्धे दीर्घकालीन, खर्चिक आणि प्रचंड विध्वंसक ठरतात, याची उदाहरणे युक्रेन आणि गाझा संघर्षांत दिसतात.

रणगाडे, तोफखाना, रायफल्स यांसारखी शस्त्रे शतकानुशतके वापरात असल्याने अशा युद्धांत निर्णायक विजय मिळवणे अवघड बनते. याउलट, नव्या युद्धक्षेत्रांत वेग, अचूकता आणि असममितता निर्माण करून कमी कालावधीत धोरणात्मक परिणाम साधता येतात. आधुनिक मोहिमांमध्ये बहु-क्षेत्रीय कारवाया, तत्काळ निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर निर्णायक ठरत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तंत्रज्ञानामुळे भूगोलाचे बंधन कमी झाले असून लष्करी व्यवहारात क्रांती घडली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, हायपरसॉनिक शस्त्रे, रोबोटिक्स, प्रगत साहित्य आणि थ्री-डी प्रिंटिंग यांचा एकत्रित प्रभाव युद्ध अधिक वेगवान व घातक बनवत आहे. सेन्सर्स, ड्रोन आणि उपग्रहांमुळे पारदर्शकता वाढली असून आश्चर्याचा घटक कमी होत आहे. मानव विरुद्ध मानवापेक्षा मशीन विरुद्ध मशीनची लढाई पुढे येत असल्याचे ते म्हणाले.

Changing nature of modern warfare
MVA alliance Congress performance : संघटनात्मक बदल काँग्रेसच्या पथ्यावर; आघाडीत भाव वाढला

‌‘जय‌’ संकल्पनेतून संरक्षणाची दिशा

भविष्यातील संरक्षण धोरण स्पष्ट करताना चौहान यांनी ‌‘जय‌’ संकल्पना मांडली. संयुक्तता म्हणजे तिन्ही सशस्त्र दलांनी एकत्रित नियोजन करून लढणे, आत्मनिर्भरता म्हणजे संरक्षण साहित्याबरोबरच स्वदेशी धोरणात्मक विचार विकसित करणे, तर नवोन्मेषामुळेच युद्धात आघाडी मिळते, असे त्यांनी सांगितले. यासाठी सैन्य, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय महत्त्वाचा असून आयआयटीसारख्या संस्थांनी संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषाचे नेतृत्व करावे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news