

ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनातर्फे दिवा रेल्वे स्थानक ते चिपळूण रेल्वे स्थानकापर्यंत मेमू लोकल रेल्वे सेवा प्रवाशांसाठी कायमस्वरूपी सुरू करण्यात आली असून मेमू लोकलच्या वेळापत्रकात काहीसे बदल करण्यात आले आहेत.
भरपूर वर्षांपासून कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि माणगाव, गोरेगाव, वीर आणि चिपळूणमधील प्रवाशांची दिवा ते चिपळूण लोकल सेवा करण्याची मागणी होती. परंतु बऱ्याच वेळा मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिवा ते चिपळूण लोकलच्या मागणीला दुर्लक्षित करण्यात आले होते. मात्र 20 ऑगस्टपासून गणेशोत्सवाच्या हंगामी काळामध्ये दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवा तात्पुरता सुरू करण्यात आली आहे. दरम्यान दिवा ते चिपळूण आणि चिपळूण ते दिवा रेल्वे स्थानकांसाठी 2 मेमू लोकल उपलब्ध केल्या आहेत.
कालांतराने मध्य रेल्वे प्रशासनातर्फे दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवेला थांबा देण्यात आला. परंतु काही स्थानिकांच्या आणि कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव आणि वीर रेल्वे स्थानकातून नियमित पनवेल, दिवा स्थानकासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मागण्यांची रेल्वे प्रशासनाकडून पूर्तता करत 15 ऑगस्टपासून दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवा कायम करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले.
मेमू लोकलच्या वेळापत्रकात देखील काहीसेे बदल घडवण्यात आले. एक मेमू लोकल दिवा रेल्वे स्थानकातून सकाळी 7.15 वाजता चिपळूण रेल्वे स्थानकासाठी रवाना होईल तसेच दुसरी मेमू लोकल चिपळूण रेल्वे स्थानकातून दुपारी 12.00 वाजता दिवा रेल्वे स्थानकासाठी धाव घेईल.
26 रेल्वेस्थानकावर थांबा
दिवा ते चिपळूण मेमू लोकल पश्चिम कोस्टल रेल्वे मार्गावरील तब्बल 26 रेल्वे स्थानकावर थांबेल. तसेच त्यांपैकी पनवेल, पेण , रोहा , माणगाव या 4 मुख्य जंक्शनवर क्रॉसिंगसाठी थांबा घेण्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवेमुळे या रेल्वे मार्गावरून प्रवाशी अवघ्या 6 तास 45 मिनिटात निश्चित स्थानकावर पोहोचतील, असे देखील दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने जाहीर केले आहे.