

ठाणे : कुटुंब, नातेवाईकांपासून दूर राहणाऱ्या कुष्ठरोगी आणि वृद्ध आजी-आजोबांसोबत संगीताच्या मधुर सुरांसोबत दीपोत्सव साजरा होणारी यंदाची रौप्य वर्षीय दिवाळी. ही दिवाळी उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या दोन पिढ्यांसोबत पनवेल येथील शांतीवन (कुष्ठरोग निवारण केंद्र) येथे अनोख्या पद्धतीने साजरी केली. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी व अन्य गायिकांनी तबलावादक विवेक भागवत यांच्या साथीने भक्तिरसाची उधळण व नृत्यांगना अदिती मुळ्ये यांच्या नृत्याविष्काराने आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद हृदयस्पर्शी ठरला.
पनवेल येथील कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवनचे विश्वस्त अध्यक्ष कै न्या. के. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या इच्छेवरून श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखनी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य दिनेश पंजवानी आणि उपप्राचार्या कै. ज्योतिका ओझरकर यांनी 2000 मध्ये हा उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांना समाजसेवेची दिशा देण्यासाठी, सकारात्मक ऊर्जेने जगण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. नवे सहस्रकात सुरुवात झालेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहबंध उपक्रमाचे 25 वे वर्ष अनोख्या पद्धतीने साजरे केले. विद्यार्थ्यांच्या दोन पिढींनी यात सहभाग घेऊन शांतिवन या कुष्ठरुग्णांच्या, वृद्धांच्या व जे संपूर्णपणे परावलंबी आहेत, अशा नागरिकांच्या वसाहतीत जाऊन दिवाळी साजरी केली.
उपप्राचार्य तथा मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन आरेकर यांनी प्रस्तावनेत गेल्या 24 वर्षाचा आढावा घेत डॉ. ज्योतिका ओझरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच पहिल्या दिवाळी कार्यक्रमापासून हजेरी लावणाऱ्या लाड आजीला श्रद्धांजली वाहिली. शांतिवनचे कार्याध्यक्ष ॲड. प्रमोद ठाकूर, प्रमुख कार्यवाह अजय शिर्के, माजी कार्यवाह विष्णू प्रभुदेसाई, प्रथम कुष्ठरुग्ण व पुनर्वसित रुग्णबंधू भगवान महाजन, पनवेलचे माजी नगराध्यक्ष मोतीलाल बांठिया यांनी सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
समितीतर्फे डॉ. नितीन आरेकर, जुई गडकरी, विवेक भागवत, पत्रकार दिलीप शिंदे, कार्तिक अय्यर, प्रा. वृषाली विनायक यांच्यासह कलाकारांचा सत्कार करून हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच पुढील वर्षी सेवा निवृत्त होणाऱ्या आरेकर यांनी शांतिवनासाठी काम करण्याचे आमंत्रण दिले.
सभागृहा बाहेरील रांगोळ्या, नृत्य-गायनाने सजलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मिळणारी शांतिवनवासीयांची साथ ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्य ठरली. अभिनेत्री व गायिका जुई गडकरी, गायक सचिन मुळ्ये, संगीत शिक्षक व गायक निषाद जोशी, गंधाली दाते, अथर्व शेवडे, तेजल पटवर्धन, स्वप्नाली कुलकर्णी यांनी आजी-आजोबांना मधूर आवाजाने भक्तिरसात चिंब केले.
नृत्याविष्काराला उपस्थितांची दाद
तबलावादक व कार्यक्रम संयोजक विवेक भागवत, आदित्य भोळे यांच्या तबला वादनासह जुईच्या वडिलांनी तबल्यावर साथ दिल्याने बाप - लेकीने सादर केलेल्या गीताने कार्यक्रमाची उंची वाढविली. नृत्यालंकार आदिती भडसावळे-मुळ्ये व तिच्या तीन शिष्यांनी सादर केलल्या नृत्याविष्कााला उपस्थितांची दाद मिळाली. निवेदिका प्रा. अनुया गरवारे-धारप हिच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत भरली. यावेळी 45 माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सोलारसाठी दीड लाखांची मदत
यावेळी विद्यार्थ्यांतर्फे 1 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश कुष्ठरुग्ण निवारण समितीला देण्यात आला. ही आर्थिक मदत शांतिवनमध्ये सोलर पॅनल उभारण्यासाठी वापरावी, अशी इच्छा उपप्राचार्य नितीन आरेकर यांनी व्यक्त केली. तसेच अभिनेत्री जुई गडकरी हिने 21 हजार रुपयांची देणगी शांतिवनच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.