

ठाणे: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अपात्र रहिवाशांचे धारावीबाहेर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ठाणे आणि मुंबईच्या वेसीवरील मुलुंड परिसरातील मिठागरांची जागा प्रस्तावित करण्यात आली आहे.
मात्र या निर्णयामुळे पायाभूत सुविधांवर ताण येण्याबरोबरच वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करत स्थानिक नागरिकांसह ठाण्यातील सामाजिक संघटनांकडून या प्रकल्पास तीव्र विरोध सुरू झाला आहे.
या प्रकल्पाविरोधात 7 जूनला जनआंदोलन होणार असून त्यात ठाण्यातील सामाजिक संघटनांही सहभागी होणार असल्याने हा प्रकल्प वादात सापडण्याची चिन्हे आहेत. धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला असताना आता या प्रकल्पावरून ठाणे आणि मुलुंड परिसरात नवीन वाद निर्माण झाला आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अपात्र रहिवाशांचे धारावीबाहेर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ठाणे आणि मुंबईच्या वेशीवरील मुलुंड परिसरातील मिठागरांची जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाला स्थानिक नागरिकांसह ठाण्यातील सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे.
धारावीतील अपात्र रहिवाशांसाठी मुलुंड येथील सुमारे 58 एकर मिठागरांची जागा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर ठाणे आणि मुंबई सीमाभागातील नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. विशेषतः ठाण्याच्या वेशीवरील आनंदनगर, मुलुंड चेकनाका, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड परिसर आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त आहे.सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांना
दररोज तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. अशातच मोठ्या प्रमाणात पुनर्वसन प्रकल्प उभारल्यास हजारो नवीन वाहनांचा भार या मार्गांवर पडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील काही वर्षांमध्ये मुलुंड भागात वसाहत वाढत आहेत. त्यात धारावीतील अपात्र झोपडीधारकांचे मुलुंडमध्ये पूनर्वसन झाल्यास येथील पायाभूत, सामाजिक, आर्थिक सुविधांवर ताण येणार असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
मुसळधार पावसाच्या काळात मिठागरांची जमीन पाणी साठवून ठेवण्याचे काम करते. त्यामुळे शहरातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत मिळते. या जागांवर मोठ्या प्रमाणात बांधकाम झाल्यास पाणी मुरण्यासाठी जागाच उरणार नाही आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो, असा दावा पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक संघटनांकडून केला जात आहे
वाद चिघळण्याची शक्यता
जनआंदोलनाची हाक या पार्श्वभूमीवर मुलुंडमधील ‘मिठागरे वाचवा समिती’ने 7 जून रोजी वझे-केळकर महाविद्यालयाजवळ जनआंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने करण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले असले तरी आता या आंदोलनाला ठाण्यातील विविध सामाजिक संघटना, नागरिक मंच आणि स्थानिक रहिवाशांचा पाठिंबा मिळू लागल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे