

ठाणे : घोडबंदर येथील विजय गार्डन परिसरात असलेल्या एका जुन्या गृहसंकुलाचीच एका विकासकाने वाट अडवली असून यामुळे नागरिकांची सुरक्षाच धोक्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामांसाठी गृहसंकुलाकडे जाणाऱ्या 9 मीटर रस्त्यावरच या विकासकाने अतिक्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. वारंवार विकासकाशी संपर्क करूनही विकासकाने दाद न दिल्याने शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी या ठिकाणी जाऊन विकासकाला थेट जाब विचारला आहे. 9 मीटरपैकी जेवढ्या रस्त्यावर विकासकाने अतिक्रमण करण्याचा प्रयन्त केला होता तो संपूर्ण रस्ता रवी घरत यांनी मोकळा करून दिल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
घोडबंदर महामार्गावरील आनंद नगर परिसरातील विजय वाटिका ही जुनी आणि मोठी सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक राहत असून या सोसायटीच्या बाजूलाच एका नवीन इमारतीचे काम सुरु आहे. मात्र या इमारतींच्या बांधकामासाठी सोसायटीकडे जाणाऱ्या 9 मीटर रस्त्यांपैकी 1 ते 2 मीटर रस्तावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी या इमारतीचे प्रवेशद्वार बाववण्याचा घाट संबंधित विकासकाने घातला असल्याचा आरोप सोसायटीच्या नागरिकांकडू करण्यात आला आहे.
नित्याप्रमाणे सोसायटीकडे जाण्यासाठी 9 मीटर रास्ता ठेवणे बंधनकारक असताना संबंधीत विकासकाने सोसायटीच्या या रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने नागरिकांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. यासंदर्भात रहिवाशांनी संबंधित विकासकाला जाब विचारण्याचा देखील प्रयन्त केला. मात्र रहिवाशांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद विकासकाकडू मिळाला नाही.
अखेर या परिसरातील शिवसेनेचे विभागप्रमुख रवी घरत यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सोमवारी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संबंधित विकासकाला देखील बोलावण्यात आले. मात्र सदरच्या काही रस्त्याचा भाग आपल्या जागेत असल्याचा दावा विकासकाडून करण्यात आला. तर हा रस्ता सोयटीचाच असल्याची ठाम भूमिका रवी घरत आणि रहिवाशांनी घेतली.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नसून हे प्रकरण पालिका आयुक्तांकडेही घेऊन जाण्याचा इशारा घरत यांनी यावेळी दिला. तर या ठिकाणी तात्काळ तात्पुरते कंपाउंड बांधण्याचे काम देखील सोसायटीच्या वतीने करण्यात आले. संबंधित प्रकरणाचा तात्काळ सोक्षमोक्ष लावण्यात आल्याने रहिवाशांनी रवी घरत यांचे यावेळी आभार मानले.
बेकायदेशीर झाडांची छटनी
या परिसरात इमारतीचे बांधकाम करताना संबंधित विकासकाने बेकायदेशीरपणे झाडांची छटनी केली असल्याचा आरोप देखील या सोसायटीमधील रहिवाशांनी केला आहे. या रस्यालागत तीन मोठी आणि जुनी जांभळाची झाडे होती. ही झाडे कापण्यात आली असून झाडे कापण्याची कोणत्याही प्रकारची वृक्षप्राधिकरण विभागाची परवानगी संबंधित विकासाकडे नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
या सोसायटीमधील सर्व नागरिक रस्त्याची समस्या घेऊन माझ्याकडे आले. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी जाऊन नागरिकांची समस्या समजून घेतली. संबंधित विकासकाला देखील बोलावून नागरिकांची समस्या त्याच ठिकाणी सोडवली. 9 मीटरपैकी काही मीटर रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयन्त करण्यात आल्याने काही घटना घडल्यास फायरब्रिगेडची गाडी आतमध्ये यायला अडचण निर्माण होऊन नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली होती.
रवी घरत, विभागप्रमुख, शिवसेना