Ambernath municipal election : निवडणूक पुढे गेल्याने उमेदवारांची खर्चाची डोकेदुखी वाढली
अंबरनाथ : न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायती मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने अंबरनाथ ची दोन डिसेंबर रोजी होणारी निवडणूक आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांची खर्चाची डोकेदुखी मात्र प्रचंड वाढली आहे. खर्च मर्यादेचा कोणताही अधिकृत कार्यक्रम जाहीर न झाल्याने खर्च मर्यादा शिथिल होणार का? या चिंतेत उमेदवार आहेत.
मागील चार नोव्हेंबर रोजी अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार अंबरनाथ मध्ये दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान होणार होते. त्या अनुषंगाने उमेदवारांना अवघे 27 दिवस प्रचारासाठी मिळाले होते. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद या उक्तीप्रमाणे अनेक उमेदवार आपल्याला निवडून येण्यासाठी प्रचाराला लागले होते. त्यासाठी खर्च मर्यादेचाही त्यांनी विचार केला नव्हता.
हा प्रचार शिगेला पोहचला असतानाच 29 नोव्हेंबर रोजी न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायती मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली. सर्व तयारी झाली असताना, आवश्यक खर्चाचेही नियोजन पूर्ण झाले असताना अचानक निवडणुकीचा कार्यक्रमच बदलल्याने उमेदवार अक्षरशः गांगरून गेले आहेत. तब्बल 18 दिवस निवडणूक पुढे गेल्याने पुन्हा इतका खर्च कुठून करायचा असा सवाल काही उमेदवार खाजगीत विचारात आहेत.
खर्चाची सांगड घालायची कशी
अंबरनाथ मध्ये 260 उमेदवार नगरसेवक पदासाठी तर 8 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी 5 लाख तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी 15 लाख रुपयांची खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. मात्र आता 18 दिवस निवडणूक पुढे गेल्याने खर्चाची ही सांगड घालायची तरी कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाच लाख रुपयांची खर्च मर्यादा असल्याने आम्ही ती मर्यादा पूर्ण केली होती. आता निवडणूक तब्बल 18 दिवस पुढे गेल्याने पुढचा खर्च कसा करायचा. ही चिंता सतावत आहे. निवडणूक आयोगाने ही खर्च मर्यादा आता शिथिल करावी.
कुणाल भोईर, उमेदवार, शिवसेना
खर्चाच्या मर्यादेबाबत कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. 4 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यानुसार त्याबाबत कळविले जाईल. त्यानुसार उमेदवारांना सूचना दिल्या जातील.
उमाकांत गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी

