मुंबई : कोणत्याही वयोगटातील महिला असो ती आपल्या सौंदर्याबाबत जागरूक असते. अनेक महिलांना शरीराच्या काही भागांबाबत समस्या येतात, तर अनेक तरुणी समाजात कौमार्य चाचणीबद्दलच्या चिंतेमुळे त्यांचा आत्मविश्वास गमावतात. यासाठीच आता महिलांच्या सौंदर्य व आरोग्यविषयक गरजांसाठी कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी ओपीडी सुरू होत आहेत. या ओपीडी खासगी रूग्णालयात आणि अधिक खर्चिक होता मात्र आता कामा रुग्णालयात पुढील वर्षी विशेष कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजिस्ट विभाग सुरू होणार असून अशी सुविधा देणारे हे देशातील पहिले सरकारी रुग्णालय आहे.
महिलांचे सौंदर्य अधिक खुलून दिसून महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी ही ओपीडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा विभाग महिलांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठीच्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करणार आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी नुकत्याच झालेल्या कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी विभाग सुरू करण्याची घोषणा केली. महिला रुग्णांना सुरक्षित, गोपनीय व तज्ज्ञ मार्गदर्शनासह अत्याधुनिक उपचार मिळावेत हा उद्देश ओपीडीमागे असल्याचे सांगितले आहे. पुढील वर्षीपासून हा विभाग सुरू होणार आहे.
आतापर्यंत, या सेवा प्रामुख्याने खाजगी रुग्णालये आणि दवाखाने उपलब्ध होत्या, जास्त खर्चामुळे सामान्य महिलांना त्या उपलब्ध होत नव्हत्या. म्हणूनच, आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील महिलांना हे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग स्थापन केला जात असल्याचे डॉ. पालवे यांनी सांगितले.
उपचारासोबत शिक्षण
हा विभाग महिलांवर उपचार करण्यासोबतच कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजीमध्ये फेलोशिप प्रोग्राम देखील सुरू करणार आहे. एमडी पदवी असलेले डॉक्टर या फेलोशिप प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतात. हा कोर्स दोन वर्षांचा असेल. सध्या या कोर्ससाठी चार जागा उपलब्ध असतील.
हा उपचार असेल
या ओपीडीमध्ये प्रसूतीनंतर होणारे बदल, योनीसंबंधित सैलपणा, पेल्विक फ्लोअरची कमजोरी, स्ट्रेच मार्क्स, हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर होणारे परिणाम अशा समस्यांसाठी आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच लेझर टाईटनिंग, व्हॅजायनल रीजुव्हनेशन, पिग्मेंटेशन रिडक्शन, हायमेन रिपेअर, लॅबियल रिडक्शन, अशा कॉस्मेटिक प्रक्रियांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन आणि उपचार ओपीडीमध्ये दिले जातील.