

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात शीतला माता मंदिराजवळील चंद्रकला म्हात्रे ही अतिधोकादायक घोषित केलेली इमारत गुरूवारी (दि.२९) अचानक कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली.
ही इमारत डोंबिवली पूर्वमधील पाथार्ली गाव हद्दीत येते. महापालिकेच्या फ प्रभाग क्षेत्रातील ही इमारत यापूर्वीच अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. सकाळी ही इमारत अचानक कोसळली असताना परिसरात मोठा आवाज होऊन घबराट निर्माण झाली होती. मात्र, इमारत रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या सहायक आयुक्त हेमा मुंबरकर, अग्निशमन विभागाचे प्रमुख नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन व्यवस्थापन पथक, तसेच फेरीवाला आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ बचाव व साफसफाईची कामे सुरू करण्यात आली. जेसीबी व डंपरच्या साह्याने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने परिसरातील रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
धोकादायक इमारतींबाबत प्रशासन सतर्क असल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे अशा इमारतींची यादी अद्ययावत करून त्वरित कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात जवळपास ४५० धोकादायक इमारती आहेत. शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींबाबत रहिवाशांनीही सतर्क राहून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.