

डोंबिवली : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. तथापी एकीकडे रस्त्यावरील खड्ड्यांपायी गणेशभक्तांच्या मनात भितीचे काहूर उठले आहे, तर दुसरीकडे खड्ड्यांचा ज्वलंत विषय हातात घेऊन राजकारणी टीकेची झोड घेत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत एकही खड्डा दिसणार नाही, गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडायचा आहे, त्यामुळे तक्रार आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिल्यानंतर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी झाडून कामाला लागले आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येने उच्चांक गाठला आहे. रहिवासी, पादचारी, वाहनचालक, प्रवासी हैराण झाले आहेत. गणेशाचे आगमन होणार आहे. तथापी सातत्याने कोसळणार्या पावसामुळे रस्ते दुरूस्ती वा खड्डेभरण प्रक्रियेला वेग देखिल देता येत नाही. अशा परिस्थितीपुढे केडीएमसी प्रशासन हतबल झाले आहे. रहिवाशांकडून होणारी टीका आणि राजकारण्यांची आंदोलने या सार्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या केडीएमसीला आता पाऊस उघडल्याची संधी मिळाली आहे.
आयुक्त अभिनव गोयल खड्डेभरण आणि दुरूस्तीच्या कामांवर बारकाईने नजर ठेवली आहे. आयुक्त गोयल हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व प्रभागातील अभियंते आणि ठेकेदारांवर लक्ष ठेवून आहेत. या संदर्भात आयुक्तांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. या बैठकीत कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरूस्ती आणि खड्डे भरणीच्या कामाचा प्रभाग निहाय आढावा घेतला.
ब्लॅक लिस्टपासून ठेकेदारांनी दूर रहावे
येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवसांत जास्तीत जास्त मशिनरी आणि मनुष्यबळ वापरून रस्ते दुरूस्ती करावेत, दिवसा आणि रात्री अशा दोन्ही सत्रात काम करावे. जास्त वाहतूक आणि वर्दळीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काम करावे, असे निर्देश आयुक्तांनी सर्व प्रभागांतील अभियंते आणि ठेकेदारांना दिले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी अपघात/आपत्ती /अप्रिय घटना घडल्यास संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट केले जाईल, असाही इशारा आयुक्त अभिनव गोयल यांनी बैठकीला उपस्थितांशी संवाद साधताना दिला.