Dombivli water crisis | डोंबिवलीसह 27 गावांत पाणीटंचाईमुळे संतापाचा कडेलोट

दावडी-गोळवलीतील रहिवाशांचा भर पावसात एमआयडीसी मुख्यालयावर हंडा, कळशी मोर्चा
Water Scarcity Triggers Public Outrage in Dombivli and 27 Villages
Water Shortage | डोंबिवलीसह 27 गावांत पाणीटंचाईमुळे संतापाचा कडेलोटPudhari File Photo
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील शहराचा काही भाग आणि 27 गावांपैकी दावडी आणि गोळवली गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी त्रस्त झालेल्या शेकडो रहिवाशांनी सोमवारी भर पावसात डोंबिवली एमआयडीसीच्या मुख्यालयावर हंडा/कळशी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. 22 तारखेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास 23 तारखेला एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोकून मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा यावेळी संतप्त रहिवाशांनी इशारा दिला.

कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या दावडी आणि गोळवलीतील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. या संदर्भात रहिवाशांनी अनेकदा एमआयडीसीसह कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे पत्रव्यवहाद्वारे तक्रारी नोंदवून लक्ष वेधले आहे. मात्र प्रत्येकवेळी लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन केडीएमसी आणि एमआयडीसीच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आले. तथापी प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करण्यासाठी कोणताही अधिकारी पुढाकार घेत नसल्याने रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. कार्यालयांत बसून केवळ खुर्च्या उबविणार्‍या अडेलतट्टू अधिकार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी संतप्त रहिवाशांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोर्चेकर्‍यांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय

सोमवारी सकाळी संतप्त झालेल्या रहिवाशांनी हातात हंडे/कळश्या घेऊन डोंबिवली एमआयडीसीच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मुसळधार कोसळणार्‍या पावसाची तमा न बाळगता भर पावसातही शेकडोच्या संख्येने रहिवासी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकर्‍यांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सोबत आणलेल्या हंडा-कळश्या उंचावून या महिलांनी कार्यालयासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पाणी पुरवठा तातडीने सुरू करा...आश्वासन नको...ठोस कृती करा...प्रत्यक्षात पुरवठा हवा...अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

23 तारखेला एमआयडीसीच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

मोर्चात सहभागी झालेल्या रहिवाशांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. येत्या 22 तारखेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मात्र 23 तारखेला एमआयडीसीच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल आणि मोठे जनआंदोलन उभारले जाईल, अशा कडक शब्दांत रहिवाशांनी उपस्थित अधिकार्‍यांना सुनावले. रहिवाशांच्या आक्रमक पावित्र्यामुळे प्रशासनावर कमालीचा दबाव निर्माण झाला आहे. प्रतिक्रियेसाठी एमआयडीसी आणि केडीएमसीचा एकही अधिकारी बोलण्यास तयार नसल्याने वस्तुस्थिती कळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news