

ठाणे: सध्या वाढलेले सायबर क्राईमचे गुन्हे चिंताग्रस्त करणारे आहे. सायबर चोरटे फसवणुकीच्या नवनवीन कल्पना अमलात आणून अनेक सर्वसामान्यांची फसवणूक घडवून आणत आहेत.
डिजिटल अरेस्ट, शेयर मार्केट गुंतवणूक, पीएफ मिळवा, बिनव्याजी कर्ज, आयकर व इतर टॅक्सचा रिफंड, शासकीय विभागात मेगा भरती, लोनच्या हप्त्यांना स्थगिती, घर बसल्या पैसे मिळवा, डेबिट कार्ड व बँक खाते पडताळणीचे फेक कॉल, ऑनलाईन जॉब, पोर्नोग्राफी साईटच्या माध्यमातून व डीपफेक व्हिडीओच्या माध्यमातून होणारी ब्लॅकमेलिंग अशा एक ना अनेक फसवणुकीच्या क्लुप्त्या या सायबर गुन्हेगारांनी सध्या शोधून काढल्या आहेत.
सायबर गुन्हे करणाऱ्या भामट्यांनी अनेक लिंक, मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. या लिंकवर क्लिक केल्यास सोशल मीडिया अकाउंट हॅक होणे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक असे प्रकार घडत आहेत. अशा सायबर क्राईम पासून सुरक्षित राहण्यासाठी सावधानता बाळगावी असे आवाहन पोलिस करीत आहेत.
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा व्हॉटसअप हॅक झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. पोलीस अधिकाऱ्यांचेच मोबाईल सुरक्षित राहत नसतील तर सर्वसामान्य जनतेच्या सायबर सुरक्षेचे रक्षण तरी कोण करणार अशी जोरदार चर्चा या निमित्ताने सोशल मीडियावर रंगली आहे.
तर सायबर सुरक्षेच्या प्रश्नावरून अनेक सामाजिक, राजकीय नेत्यांनी यंत्रणेवर टीका देखील केली आहे. सध्या सायबर गुन्हेगारांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून सायबर फसवणूक सुरूच आहे.
सायबर गुन्हेगार आता राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी व नागरिकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील पाळत ठेवू लागले आहेत. सोशल मीडियावरील उपलब्ध फोटो व अन्य माहितीच्या आधारे फेक प्रोफाईल बनवणे, व्हाट्सअप व फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करणे असे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत.
सायबर गुन्हेगार अनेकांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितात. फ्रेंड रिक्वेस्टसोबत एक मेसेज पण येतो. त्यात माझा आधीचा अकाउंट हॅक झाल्यामुळे हा नवीन अकाउंट आहे, असे म्हटलेले असते. सर्वसामान्य नागरिक यावर विश्वास ठेवून ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात. मग या अकाउंटवरून कधी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर एखादे चुकीचे ऍप डाउनलोड करायला सांगितले जाते.
आपण तसे केल्यास मोबाईल किंवा लॅपटॉपचा कंट्रोल या सायबर गुन्हेगारांकडे जातो. ते त्याद्वारे तुमचा सर्व डेटा चोरून घेतात. त्यानंतर बँक खात्यातील पैसे दुसरीकडे ट्रान्स्फर करून आर्थिक फसवणूक करणे.
सोशल मीडिया अकाउंट हॅक करणे आदी प्रकार करतात. काही वेळा असे हॅकर्स शासकीय विभागांच्या नावाने वेबसाईट बनवून अथवा शासकीय विभागाच्या आयडीची मिळतीजुळती फेक लिंक बनवून साेशल मीडियावर व्हायरल करतात. या लिंकवर क्लिक करताच फोन अथवा सोशल मीडिया अकाउंट हॅक होतो.
अशा हॅकर्स व सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. पोलिसांनी अशा सायबर भामट्या व बनावट आयडीपासून सतर्क हाेण्याची विनंती केली आहे. यातून वाचण्याचा एकच पर्याय म्हणजे अनाेळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंक ओपन करू नये. काेणत्याही प्रकारची फाईल माेबाईलमध्ये इन्स्टाॅल करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दुसरीकडे बँकेच्या नावाने फेक कॉल करून फसवणूक होण्याच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. मी तुमच्या बँकेतून बोलत असून तुमचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड बंद पडले आहे, ते परत सुरु करण्यासाठी तुमचा पासवर्ड द्या अशी थाप देऊन नागरिकांना गंडविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा कॉलला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस म्हणतात जागरूकता हीच सुरक्षितता
हल्लीच्या काळात जो जागृत राहील तोच सुरक्षित राहणार आहे. सोशल मीडियावर कुठल्याही ठिकाणी आपली व्यक्तिगत माहिती देतांना अथवा मोबाईलवरील लिंक ओपन करताना आधी संपूर्ण माहिती मिळवणे गरजेचे आहे. पोलीस या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी राज्यात सर्वत्र समन्वय ठेवून आहेत.
पोलिसांचा सायबर विभाग समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. फेक लिंक पाठवणारे, अफवा पसरवणारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तरी देखील सोशल मीडिया वापरतांना सावधानता बाळगावी. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका. तसेच आपल्या सर्व फोटोज व फोटो अल्बमची प्रायव्हसी सेटिंग अपडेट करा असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.