

खांदा कॉलनी: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पनवेलकरांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पाणीप्रश्नावर विशेष बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या दालनात सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत अरविंद म्हात्रे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन सादर करत पनवेलच्या पाणीप्रश्नाशी संबंधित तब्बल १७ महत्त्वाचे मुद्दे पालकमंत्र्यांसमोर मांडले. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातून पनवेलकरांसाठी किमान ३० एमएलडी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.
तसेच २०१८ मध्ये एका विकासकाला मोरबे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करून हा जलसाठा पनवेलच्या नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
केवळ मोरबे धरणावर अवलंबून न राहता पनवेल तालुक्यातील जांभिवली धरण, ओवे कॅम्प धरण, उसरण धरण आणि पोशीर जलप्रकल्प यांसारख्या जलस्रोतांचाही पनवेलच्या पाणीपुरवठ्यासाठी उपयोग होऊ शकतो, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले.
या जलस्रोतांची त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली असून, त्याबाबतची माहितीही बैठकीत सादर केली. या सर्व जलस्रोतांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन उपलब्ध जलसाठा पनवेलच्या जनतेसाठी वापरण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री गोगावले यांनी दिले.
पनवेल शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची गरज आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पनवेलकरांची तहान भागवण्यासाठी कोणत्या नवीन पाणीपुरवठा योजना राबवाव्यात, तसेच सध्याच्या पाणीटंचाईवर तातडीने कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना करण्यात आल्या.
या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, महापौर नितीन पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, नगरसेवक हरेश केणी, तुषार पाटील, रामदास शेवाळे, ॲड. प्रथमेश सोमण यांच्यासह जलसंपदा विभाग, सिडको, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रत्यक्षात किती पाणी मिळणार?
बैठकीत ३० एमएलडी पाण्याची मागणी आणि विविध जलस्रोतांचा वापर करण्याबाबत सकारात्मक आश्वासने देण्यात आली असली, तरी या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, हा प्रश्न पनवेलकरांसमोर कायम आहे. त्यामुळे बैठकीतील आश्वासनांचे रूपांतर प्रत्यक्ष पाणीपुरवठ्यात कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.