

ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून नवीन वर्षात ठाणे महापालिकेची निवडणूक होईल. त्याची पूर्व तयारी सर्व पक्षांनी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये स्वबळाचा नारा देत सर्वच पक्षांनी इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात केले आहे. अवघे तीन नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाकडे तब्बल 163 जणांनी उमेदवारी मागितली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 238 इच्छुक उमेदवारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सक्षम उमेदवार निवडीसाठी दोन्ही काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ठाणे महापालिकेवर 30 वर्ष शिवसेनेचे राज्य असून त्यांनी भाजपला सोबत ठेवून भगवा फडकविलेला आहे. आगामी महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढवायची की स्वबळावर याचा निर्णय झाला नसला तरी भाजपने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली असून जोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेऊन शिंदे शिवसेनेला टक्कर देण्याची रणनीती आखली जात आहे.
ठाण्यातील महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक सक्षम पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे पाहिले जाते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 नगरसेवक जिंकून आले होते. तर काँग्रेसचे तीन नगरसेवक होते. शिवसेनेने 67 जागा आणि भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेत बंड होऊन पक्षाची दोन शकले झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकले.
दरम्यान, कमजोर असलेल्या काँग्रेसकडे आजपर्यंत 167 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे तब्बल 238 इच्छुकांनी अनामत रक्कमेसह उमेदवारी अर्ज भरले आहेत. या इच्छुकांची संख्या पाहता महाविकास आघाडीकडेही उमेदवार निवडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल, असे दिसून येते.
इच्छुकांचे अर्ज पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवितायेत
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुंब्र्यातील सहा नगरसेवकांनी आमदार जिंतेद्र आव्हाड यांच्या विरोधात जाऊन स्थानिक विकास आघाडी स्थापन केली. तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कळव्यातील चार नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर झाली. आता काँग्रेसकडे फक्त एकच नगरसेवक शिल्लक आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे शिवसेना कमजोर झाली आहे. त्यांच्याकडे तीन ते चार माजी नगरसेवक आहेत. मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नव्हता. अशा पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांचे आलेले अर्ज हे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविण्यास कारणीभूत ठरताना दिसत आहे.